| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० नोव्हेंबर २०२४
सांगलीत दादा घराण्याने केलेली बंडखोरी ही भाजप पुरस्कृत होती. आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांची या बंडखोरीस साथ होती. त्यामुळे आगामी काळात विशाल पाटलांच्या या दुतोंडी राजकारणाचा जनता हिशोब करेल. एकसंध झालेली काँग्रेस दादा घराण्याच्या या पक्षविरोधी कारभारामुळे दुभंगली असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला त्यांनी मुंबईत वृत्त वाहिनीन्यांना आज मुलाखत दिली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही दिवसापूर्वी झालेली लोकसभा निवडणुक विशाल पाटील यांनी अपक्ष लढवली. त्या वेळेस मी स्वत: आमचे नेते विश्वजीत कदम यांच्यासह सर्व काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलो आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. परंतु विशाल पाटील यांनी याची जाण ठेवली नाही. विधान सभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्याच घराण्यातील बंडखोराला पाठिंबा दिला. प्रचार शुभारंभासह प्रचार समारोपास ते बंडखोराच्या स्टेजवर उपस्थित राहिले.
वृत्तवाहिन्याशी बोलताना पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले की, अपक्षाची बंडखोरी ही भाजप मात्र पुरस्कृत होती हे सर्वज्ञात आहे. त्यांनी व त्यांच्या घराण्यातील बंडखोर उमेदवाराने भाजप विरोधारत शब्दही न उभारता केवळ आणि केवळ माझ्यावस्व टिका करण्यात धन्यता मानली. सांगली विधानसभा मतदार संधात महाविकास आघाडी विरोधात प्रचार करणारे विशाल पाटील अन्य मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करीत होते. ही बाब जनतेला आवडली नाही, असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
आगामी काळात विशाल पाटलांना याची किंमत मोजावी लागेलच शिवाय त्यांच्या दुतोंडी राजकारणाचा फटका त्यांना बसेल असे ही पृथ्वीराज पाटील म्हणाले. विशाल पाटलांसह बंडखोराला मदत केलेल्या माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या कार्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला आहे. जयश्री पाटील यांच्यावर पक्षाने ६ वर्ष निलंबनाची कारवाई केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत बंडखोर अपक्ष उमेदवाराला मदत करणाऱ्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या वर आता काय कारवाई होते, याकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमी चे लक्ष लागून राहिले आहे.