yuva MAharashtra अदाणी समूहाने जारी केले अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका !

अदाणी समूहाने जारी केले अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ नोव्हेंबर २०२
मुबई शेअर बाजारात काल व्यवहारांची सुरुवातच मोठ्या आर्थिक भूकंपानं झाली. तिकडे अमेरिकेत गौतम अदाणींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि इकडे मुंबईत शेअर बाजार गडगडला. आरोप झालेली रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकदारांचे पहिल्या तासाभरात अडीच लाख कोटींहून जास्त नुकसान झालं. त्यापाठोपाठ भारताच्या राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या. विरोधी पक्षांनी अदाणींवर टीका करतानाच भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. राहुल गांधींनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीररीत्या टीका केली. या प्रकरणावर आता अदाणी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.

काय आहे अदाणींच्या निवेदनात?

अदाणी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणाच्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आलं आहे. "अमेरिकेच्या विधी विभागाकडून 'अदाणी ग्रीन्स'च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत", असं या निवेदनात सुरुवातीलाच नमूद करण्यात आले आहे.


"अमेरिकेच्या विधी विभागानंच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबींची विचार करत आहोत", असंही या निवेदनात अदाणी समूहाकडून सांगण्यात आले आहे. 

"अदाणी समूह कायद्यांना बांधील"

दरम्यान, अदाणी समूह कायद्याचे पालन करण्यासाठी बांधील असल्याचं निवेदनात म्हटले आहे. "अदाणी समूह कायमच व्यवस्थापनाच्या सर्वोच्च तत्त्वांचं पालन करत आला आहे. त्याशिवाय, कारभारात पारदर्शकता आणि कंपनीच्या सर्वच विभागात नियमांचे पालन या बाबी अदाणी समूहासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की अदाणी समूह हा एक कायद्याचे पालन करणारा समूह असून सर्व कायद्यांचा आदर राखतो", असेही निवेदनाच्या शेवटी लिहिले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. खुद्द गौतम अदाणी व त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असल्याचा हा आरोप आहे. या सगळ्यांनी मिळून सौर ऊर्जा वितरणाचं कंत्राट मिळवण्यासाठी काही सरकारी अधिकाऱ्यांना २ हजार ०१९ कोटी रूपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. अदाणी व अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी हा सगळा प्रकार कर्जदार व गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला व त्यातून ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज व रोखे गोळा केले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.