yuva MAharashtra सांगली, जत, खानापुरात बंडखोरी; महाविकास आघाडी की महायुती कोणाला फटका ?

सांगली, जत, खानापुरात बंडखोरी; महाविकास आघाडी की महायुती कोणाला फटका ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२
सांगली जिल्ह्यातील सांगली, जत आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम आहे. सांगलीत काँग्रेसच्या विरोधात जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. येथील भाजपचे शिवाजी डोंगरे यांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बंडखोरी टाळण्यात भाजपला यश आले आहे. तर, जतमध्ये भाजपचे नेते तम्मनगौडा रविपाटील यांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. खानापूरमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितलेल्या माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. गेल्या महिनाअखेरपर्यंत ते भाजपमध्ये होते.

सांगली जिल्ह्यातील पाच मतदार संघात बंडखोरांनी झेंडा फडकावत पक्षापुढे आव्हान निर्माण केले होते. आज (सोमवारी) त्यांच्या माघारीकडे लक्ष लागले होते. सांगली मतदारसंघाबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांच्या बंडखोरीने आता काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. येथे काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील तर भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ रिंगणात आहेत. येथे भाजपकडून शिवाजी डोंगरे यांच्या माघारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले गेले आणि त्याला यश आले. भाजप बंडखोरी टाळण्यात यशस्वी ठरले.


जत मतदार संघात भाजपने आटपाडीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. माजी आमदार विलासराव जगताप यांनी या नाराज गटाचे प्रतिनिधीत्व केले आणि तम्मनगौडा रविपाटील यांनी बंडखोरी करावी, यावर शिक्कामोर्तब झाले.

प्रकाश जमदाडे यांनी अर्ज मागे घेतला. तेथे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अपक्ष तम्मनगौडा रविपाटील अशी लढत होईल.खानापूर मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वैभव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव आहेत.

या ठिकाणी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख इच्छुक होते. ते भाजपचे नेते आहेत, मात्र शरद पवार यांची सांगलीत भेट घेतल्यानंतर त्यांनी मी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहे, असे सांगितले होते. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी बंडखोरी केली आहे. आता ही बंडखोरी राष्ट्रवादी विरोधातील म्हणायची की महायुती विरोधातील हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळ आहे.

मिरज मतदारसंघात प्रचंड गोंधळानंतर एकास एक लढत होणार आहे. येथून काँग्रेसचे मोहन वनखंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे, काँग्रेसचे सी. आर. सांगलीकर या सर्वांनी माघार घेतली आहे. येथे भाजप उमेदवार सुरेश खाडे विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचे तानाजी सातपुते अशी लढत होईल. वंचित बहुजन आघाडीकडून विज्ञान माने रिंगणात आहेत.