| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ३ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघडीच्या नेतेमंडळींची धावपळ सुरु आहे. चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने मनधरणी करण्यासाठी एकीकडे नेतेमंडळी जीवाचे रान करीत आहेत. दुसरीकडे बंडखोरी करणारी मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
जतमधील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकरांच्या विरोधातील बंडखोरांचे आव्हान कायम आहे. बंडखोरी करणारे मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जतमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 नोव्हेंबरला प्रचार सभा घेणार आहेत.
जत मतदारसंघांमध्ये गोपीचंद पडळकर महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत रिंगणात आहेत. तमनगौडा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे जत विधानसभेला तिरंगी लढत होत आहे. भूमिपुत्राचा उपस्थित मुद्दा उपस्थित करून भाजपचे (Bjp) माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे पडळकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सांगली जिल्ह्यामधील शिराळा मतदारसंघांमधील सम्राट महाडिक यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले असले, तरी दुसरीकडे जत विधानसभेतील बंडखोरांची डोकेदुखी कायम आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील बंडखोर उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे पाटील अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे समजते. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. बंडखोर शांत होण्यास तयार नसल्याने आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत विधानसभेला लक्ष घातले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा जतमध्ये होणार आहे. त्यामुळे बंडखोर थांबत नसल्याने या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे.