| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ नोव्हेंबर २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निर्णय मिरज न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. कांबळे यांनी दिला. 2019 साली सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढवताना आचारसंहिता काळात दि.04/04/2019 रोजी शिपुर, डोंगरवाडी, बेळंकी, जानराववाडी, संतोषवाडी, कदमवाडी, एरंडोली, मालगाव आदी गावातील कार्यकर्त्यांचा विनापरवाना मेळावा घेतला होता. याबाबत विशाल पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात होता. मिरज न्यायालय श्रीमती आर. व्ही. कांबळे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन खासदार विशाल पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बचाव पक्षाकडून ऍड. इर्शाद पालेगार यांनी काम पाहिले.
या निवडणुकीत विद्यमान खासदार विशाल पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता, जो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला होता. मात्र या पराभवातून खचून न जाता विशाल पाटील यांनी विविध आंदोलने व कार्यक्रमातून जनतेशी संवाद राखला होता.
2019 प्रमाणेच 2024 मध्येही काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी महाआघाडीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि एक इतिहास घडविला.