yuva MAharashtra काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी यंदाची विधानसभा निवडणूक !

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी यंदाची विधानसभा निवडणूक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ नोव्हेंबर २०२
स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये लोकशाहीचे राज्य आले आणि राजेशाही नष्ट होऊन देशात व राज्यात लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींची सरकारे स्थापन झाली. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या काँग्रेसला स्वातंत्र्योत्तर काळानंतर सहाजिकच महत्व प्राप्त झाले आणि याच विचाराची मंडळी सरकारात स्थानापन्न झाली. पण राजघराणी काळाच्या पडद्याआड गेली असली तरी, लोकशाहीचे झूल पांघरून एका अर्थाने नवी राजेशाही अस्तित्वात आली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. राजेशाहीत मोठे राजे छोट्या छोट्या राजांना आपले मांडलिक बनवीत, आणि आपल्या राज्याला व सत्तेला धोका निर्माण होऊ नये म्हणून या मांडलिक राजांचे 'बोन्साय' बनवीत. थोड्याफार फरकाने हीच पद्धत राजकीय क्षेत्रातही निर्माण झाली असे म्हणावे लागेल. देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या अनेक पहिल्या फळीतील मोठ्या नेत्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांना 'बोन्साय' बनवल्याचेच बोलले जाते.

या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्यानंतर राज्याच्या व देशाच्या राजकारणात (स्व.) सांगलीने आपले वर्चस्व निर्माण केले. नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगलीला सहकार पंढरी असे संबोधले जाऊ लागले. वसंतदादांनी आपल्या सहकाऱ्यांच्या जोरावर सांगलीचे स्थान अबाधित ठेवले. नंतरच्या काळात (स्व.) राजारामबापू पाटील यांनी वसंतदादांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपले अस्तित्व निर्माण केले. आणि येथूनच सांगलीतील राजकारणात दोन पाटील घराण्याची सत्ता फिरत राहिली. या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर जिल्ह्याचे नेतृत्व जयंत पाटील, प्रकाशबापू पाटील, विष्णूअण्णा पाटील यांच्याकडे आले. त्याचवेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आपला गड शाबूत ठेवला. 


याच दरम्यान आणखी एक घराणे (स्व.) पतंगरावजी कदम यांच्या रूपाने नावा रूपाला आले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून स्व. पतंगराव कदम यांनी केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात किंबहुना देशात आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केले. आणि राजकारणातही आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर विश्वजीत कदम यांच्या रूपाने नव्या दमाचा तरुण सांगली जिल्ह्याला लाभला. मधल्या काळात मदन पाटील या दादा घराण्यातील तरुणाने आपला दबदबा निर्माण केला. परंतु त्यांचे वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून सांगली पासून मुंबई पर्यंत अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. (दुर्दैवाने) दादा घराण्यातील एक गट यामध्ये सहभागी झाल्याचे सर्वश्रुत आहे.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले. मात्र आर आर आबा हयात असेपर्यंत, त्यांच्या नेतृत्वालाही जिल्ह्यात बांधून ठेवण्यात आले. परंतु आर आर आबांच्या निधनानंतर जयंत पाटील हेच जिल्ह्याचे नेते बनले. त्यांचे राजकारण 'जयंती नीती' म्हणून ओळखली जाते हे नव्याने सांगणे नको. दरम्यान दादा घराण्यात राजकीय वर्चस्वातून पडलेली फूट तिसऱ्या पिढीतही कायम राहिली. मात्र गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपसातील मतभेद विसरून विशादादा व मदनभाऊ गट एकत्र आले. परंतु त्यांच्या मागे खरी शक्ती होती ती डॉ. विश्वजीत कदम यांचीच. 

लोकसभेत विजय प्राप्त केल्यानंतर दादा घराण्याने पुन्हा उचल खाल्ली मात्र विधानसभा निवडणुकीतील निकालाने दादा घराण्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. साठ वर्षाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीतील डिपॉझिट जप्त होण्याची वेळ दादा घराण्यावर आली. त्याचवेळी डॉ. विश्वजीत कदम व जयंत पाटील यांच्यावरही आत्मचिंतनाची वेळ आली आहे. 

या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील असोत किंवा डॉ. विश्वजीत कदम अथवा खा. विशाल पाटील. या सर्वांनीच कार्यकर्त्यांना विशेषतः जनतेला पर्यायाने मतदारांना गृहीत धरण्याची चूक तर केली नाही ना ? 'खरे ते आपले म्हणणे ऐवजी आपले तेच खरे !' असे झाले का ? याचे आत्मचिंतन या तीन नेत्यांनी करण्याची गरज या निवडणुकीने निर्माण केली आहे. भविष्यात जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या नेत्यांनी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना स्वतःपेक्षा पक्षाला आणि दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांना महत्त्व देण्याची गरज आहे का ? याचा विचार करावा अशी चर्चा कार्यकर्त्यातून ऐकण्यात ण्यास येत आहे. एकंदर ही विधानसभा निवडणुकीत सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे.