| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ४ नोव्हेंबर २०२४
'कायम दुष्काळी तालुका' हा डाग पुसण्याच्या मुद्द्यावर गेली 40 वर्षे विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका जत तालुक्यात गाजल्या. म्हैशाळ योजनेचे पाणी जत तालुक्याच्या वेशीवर पोहोचल्यानंतर त्याच्या श्रेयवादावरूनही निवडणुकीत मुद्दा गाजला. जत तालुक्यातील पूर्वेकडील तहानलेल्या 48 गावांनी कर्नाटकात जाण्याची धमकी देऊनही, या गावांसह तालुक्याची संपूर्णतः भागली नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही हाच मुद्दा प्रचारातील महत्त्वाचा ठरेल असे वाटत असतानाच, गोपीनाथ पडळकर यांची लादलेली उमेदवारीमुळे "स्थानिक विरुद्ध उपरा" हाच सध्या भाजपासाठी खतरा बनला आहे.
भाजपकडून रवी तमनगौडा पाटील हे यावेळी भाजपकडून इच्छुक होते. गेले काही महिने ते यासाठी प्रयत्नशील होते. मतदार संघात त्यांनी निवडणुकीपूर्वीच प्रचार यात्रेच्या माध्यमातून आपल्या बाजूने वातावरण निर्मिती केली. यावेळी जत तालुक्याचे किंगमेकर विलासराव जगताप यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला व 'बाहेरचा उमेदवार' येथे चालणार नाही, स्थानिक उमेदवारालाच संधी देण्याची मागणी केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ पडळकर यांनाच उमेदवारी देऊन आपली मैत्री जपली. आता याच मैत्रीमुळे भाजपच्या मताला कात्री लागण्याची खात्री विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.
याचवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनीही या संधीचा फायदा घेत हाच मुद्दा प्रचारात अग्रेसर ठेवून असल्याचे संकेत मिळत आहेत. जत मतदारसंघातील विजयात टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या धनगर समाजाला त्यांनी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी गेल्या पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाची यादी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
विक्रमसिंह सावंत हे माजी मंत्री व सांगली जिल्हा काँग्रेसचे उभारते नेतृत्व आल्यावर. डॉ. विश्वजीत कदम यांचे नातेवाईक असल्याने, कदम यांच्या जत तालुक्यातील असलेल्या पाठबळाचाही चांगलाच फायदा सावंत यांना होणार आहे. त्यामुळे यावेळी 'उपऱ्या विरुद्ध दोन भूमिपुत्र' अशी लढत हे ते पहावयास मिळणार असून, आता या दोन भूमिपुत्रांपैकी कोणता भूमिपुत्र विधानसभेत पोहोचतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे...