yuva MAharashtra 'काँग्रेसमुळे 7 ते 8 जागा धोक्यात', मतदानाआधीच जयंत पाटलांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन!

'काँग्रेसमुळे 7 ते 8 जागा धोक्यात', मतदानाआधीच जयंत पाटलांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन!


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. १६ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. बुधवार 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्व 288 जागांवर मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत, पण मतदान पार पडण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे, त्यातच बंडखोरांनी दोघांसमोर आव्हान उभं केलं आहे. जयंत पाटलांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये या बंडखोरीचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

भाजपने महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी अनेकठिकाणी बंडखोर उमेदवार उभे केले आहेत, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. 'अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष आणि तिकीट नाकारलेल्या बंडखोरांना रसद पुरवली आहे. हे उमेदवार आमच्या उमेदवारांना धोका निर्माण करू शकतात, पण मतदारांनी याला बळी पडू नये, असं आवाहन आम्ही करत आहे', असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

'काँग्रेसला त्यांच्या बंडखोरांना थांबवण्यात यश आलं नाही हे दुर्दैवी आहे. याचा फटका आम्हाला 7 ते 8 जागांवर बसू शकतो. सांगलीमधली स्थिती विचित्र आहे. तिथले खासदार उघडपणे महाविकासआघाडीच्या विरोधात बंडखोर उमेदवाराचा प्रचार करत आहेत. हे टाळता आलं असतं', असं जयंत पाटील म्हणाले आहेत.


महाविकास आघाडीत खटके

बंडखोरीवरून महाविकास आघाडीमध्ये याआधीही खटके उडाले आहेत. रामटेकमध्ये काँग्रेस बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी काँग्रेस नेते सुनिल केदार उघडपणे प्रचार करत आहेत. तर सोलापूरमध्येही महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रणिती शिंदेंसाठी काम केलं, आता प्रणिती शिंदेंनीही शिवसेनेसाठी काम करावं, असं सोलापूरच्या सभेत म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. तर सोलापूरमध्येच प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातही खटके उडाले आहेत.