| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑक्टोबर २०२४
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती आज शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये पार पडल्या. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी स्वागत केले. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते सुती पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सांगली जिल्हा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक खा. प्रणितीताई शिंदे यांनी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी खासदार विशालदादा पाटील उपस्थित होते.
इच्छुकांमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व श्रीमती जयश्री पाटील, मिरजेतून मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर, धनराज सातपुते, शशिकांत बनसोडे, दयाधन सोनवणे, रविंद्र कोलप, नंदादेवी कोलप, अरुण धोतरे
इस्लामपूरमधून मनिषा रोटे व जितेंद्र पाटील, शिराळ्यातून रवी पाटील, खानापूर - आटपाडीमधून रविकांत भगत व गजानन सुतार आणि जतमधून आमदार विक्रमसिंह सावंत व तुकाराम माळी यांनी मुलाखती दिल्या.
मुलाखतीचा अहवाल निरीक्षक खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करणार आहेत. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाच्या विविध सेल, विभाग व आघाड्यांचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषतः सांगली व मिरज यासह आटपाडीतून एकाहून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अग्रहक्काने आपल्या विचार करावा यासाठी आग्रह धरला होता. प्रत्येक उमेदवाराचे पाठीराखे यावेळी उपस्थित होते त्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती.
आता मुलाखती दिलेल्या कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार याबाबत, उपस्थित कार्यकर्त्यांमधून तर्कवितर्क लढवले जात होते. यामध्ये सर्वाधिक चर्चा होती, ती सांगली व मिरज मतदार संघाची. सांगली विधानसभा मतदारसंघ तर हाय व्होल्टेज मतदार संघ बनला आहे. येथून पृथ्वीराजबाबा पाटील व श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी उमेदवारी बाबत जोरदार दावेदारी केली आहे. तर मिरज मतदारसंघातही मोठ्या घडामोडी पहावयास मिळत आहेत. भाजपा मधून काँग्रेसमध्ये आलेले प्रा. मोहन वनखंडे यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. मात्र त्याच वेळी निष्ठावंतांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. प्रा. वनखंडे यांना उमेदवारी दिली गेल्यास सांगली प्रमाणेच मिरजेतही बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.