yuva MAharashtra कोल्हापूर रस्ता, शामराव नगर परिसराचा आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी कायापालट केल्याने पाठीशी राहण्याचा केला निर्धार !

कोल्हापूर रस्ता, शामराव नगर परिसराचा आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी कायापालट केल्याने पाठीशी राहण्याचा केला निर्धार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑक्टोबर २०२
कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वसाहती तसेच शामरावनगर परिसराचा गेल्या दहा वर्षात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कायापालट केला आहे. गटारी, रस्ते यासह अनेक कामे सुधीरदादांनीच गेल्या दहा वर्षात केली आहेत असे मत येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आले.

हॉटेल चालक, मालक असोसिएशनतर्फे परिसरातील व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी तसेच रहिवासी यांची व्यापक बैठक झाली. हॉटेल चालक- मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते सुद्धा सुधीरदादाच सोडवतील. त्यामुळे त्यांच्याच पाठीशी सर्वांनी राहिले पाहिजे असे आवाहन केले. कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा वसाहती तसेच शामरावनगर परिसरामध्ये पूर्वी कोणत्याच लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नव्हते. परंतु सुधीरदादा गाडगीळ यांनी सातत्याने या भागात रस्ते, गटारी अशा अनेक सुविधा कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या आहेत असेही यावेळी सांगण्यात आले.


यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. सुधीरदादा म्हणाले की, शामरावनगर तसेच कोल्हापूर रस्त्याच्या परिसरातील सर्व वसाहतीमध्ये गेल्या दहा वर्षात मी मोठ्या प्रमाणात रस्ते, गटारी अशी कामे केली. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे पाणी साठून राहिले आहे. या संदर्भात मी निश्चितच कार्यवाही करीन.

यावेळी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी परिसरातील समस्याबद्दल माहिती दिली. त्या सोडवण्यासाठी सुधीरदादांनी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली. तसेच कृष्णा नदी महापूर नियंत्रण समितीचे सुयोग हावळ यांनी शामरावनगर परिसरातील सांडपाणी आणि पावसाच्या प्राण्याचा निचरा हा प्रश्न मांडला. शैलेश पवार यांनीही व्यावसायिकांचे प्रश्न मांडले. सुधीरदादा गाडगीळ यांनी हे सर्व विषय निवडणुकीनंतर निश्चितपणे मार्गी लावले जातील अशी ग्वाही दिली.

माजी आमदार नितीन शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या सौ. नीता केळकर, संभाजीराव सावर्डेकर, बाळासाहेब पाटील, मोहन गाडेकर, वसंत पाटील, उल्हास सूर्यवंशी, गजानन शिंदे, सुहास कुलकर्णी, लियाकत शेख, समीर मोमीन आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाच्या वेळी पैलवान ग्रुपतर्फे सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याबरोबर सांगलीतील सरकारी तालमीच्या नुतनीकरणाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. शैलेशभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.