yuva MAharashtra बाळासाहेब थोरात येताच महाविकास आघाडीतील तिढा सुटला; आता लक्ष उमेदवारांच्या नावाचा तिढा सोडवण्याकडे !

बाळासाहेब थोरात येताच महाविकास आघाडीतील तिढा सुटला; आता लक्ष उमेदवारांच्या नावाचा तिढा सोडवण्याकडे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑक्टोबर २०२४
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे नेते संजय राऊत या दोघांमध्ये विदर्भातील जागांवरून झालेली खडाजंगी, पटोले असतील तर शिवसेना चर्चेत सहभागी होणार नाही हा घेतलेला निर्णय. आणि त्यानंतर दिल्लीवरून आलेला थेट आदेश, बाळासाहेब थोरात यांची अचानक झालेले एन्ट्री. यामुळे महाविकास आघाडीतील चर्चेचे अडलेले घोडे दवडू लागले असून सर्व गुंता सुटल्याची माहिती महाविकास आघाडीतील नेते अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

एका बाजूला महायुतीने आपल्या 99 उमेदवारांची यादी कालच जाहीर केले होते मात्र अजूनही महाआघाडीतील संभाव्य उमेदवारांची यादी गुलदस्त्यातच राहिल्याने, हा करण्यातील चर्चेचा विषय बनला होता. आज सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अद्यापही ना महाविकास आघाडीच्या कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला ला महायुतीच्या उमेदवारांनी. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे ती गुरुपुष्यमृताची... तोपर्यंत महाविकास आघाडीतील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.


महायुतीप्रमाणेच महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही 'सांगली पॅटर्न' अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आणि याची सुरुवातही सांगली विधानसभा मतदारसंघातूनच झाली आहे हे विशेष. पृथ्वीराजबाबा पाटील आणि जयश्रीताई पाटील हे दोघेही उमेदवारी बाबत हटून बसले आहेत. जवळपास प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसमध्ये हीच स्थिती आहे. याचे कारण लोकसभा निवडणुकीत मिळालेला काँग्रेसचा 'वाढता टक्का'...

आणि म्हणूनच महाआघाडीतील पक्षांनी जागा वाटपात जरी सामंजस्याने तोडगा काढला तरी, त्यांच्यासमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. 'बंडोबांना कसे खंडोबा करायचे ?' याचा निर्णय अवघ्या एक किंवा दोन दिवसात घ्यावा लागणार आहे. कारण हा निर्णय झाल्यानंतरच महाआघाडीतील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. आणि त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि निवडणुकीची तारीख यामध्ये अवघ्या 15 ते 20 दिवसांचा अवधी मिळणार असल्याने प्रचारासाठी सर्वच उमेदवारांना पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पालथा घालावा लागणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे ते सोशल मीडियाची... कारण इतर सर्व माध्यमांपेक्षा सोशल मीडियातून होणारा प्रचार अत्यंत वेगाने होत असल्याचे अलीकडील निवडणुकीमध्ये सिद्ध झाले आहे. आता प्रतीक्षा आहे ती महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची.