Sangli Samachar

The Janshakti News

भाजपाचा पुणे जिल्ह्यातील आणखीन एक बडा नेता राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) गळाला !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १० ऑक्टोबर २०२४
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले. देशभरातील भाजप प्रेमींनी याचा आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातील भाजपमध्येही जल्लोष पाहावयास मिळाला. या विजयाने भाजपमधील आउटगोइंग थांबेल असे वाटले असतानाच, पुणे जिल्ह्यातील आणखी एक बडा नेत्याने राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची तयारी केली असल्याने हरियाणा विजयामुळे महाराष्ट्रातही 'हरियाणा पॅटर्न' निर्माण होईल या शक्यतेला छेद गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, कागलचे समरजीत घाडगे यांच्यानंतर पुण्यातील भाजपचे एक बडे प्रस्थ संजय काकडे हे राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः प्रसिद्धी माध्यमांशी दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या दसऱ्यानंतर मी सीमोल्लंघन करणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. माझ्यासोबत ३-४ आमदार व २२ नगरसेवक सुद्धा सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.


गेल्या दहा वर्षात भाजपने वापर करून घेतला तरीही मी पक्षासाठी काम करत होतो. मात्र लोकसभा निवडणुकीत मला नाकारण्यात आले. माझ्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतले गेले नाही. आणि म्हणूनच भाजपमधील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे असे संजय काकडे यांनी प्रसिद्धी माध्यमातून बोलताना सांगितले. यावेळी बोलताना म्हणाले की माझी व देवेंद्र फडणवीस यांची गेल्या पंधरा वर्षापासून मैत्री आहे त्यामुळे पक्ष सोडण्यापूर्वी उच्च रक्त म्हणून मी त्यांची भेट घेणार असून, मी माझा निर्णय त्यांना सांगणार आहे. 

त्यामुळे आता या भेटीत देवेंद्र फडणवीस त्यांची नाराजी दूर करणार का ? आणि त्याचा परिणाम संजय काकडे हे पुन्हा कमळ हातात घेणार का ? अशी चर्चा रंगली असतानाच, संजय काकडे यांच्या भूमिकेमुळे भाजप बरोबरच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी दोन-तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असून, संजय काकडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.