| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
'विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा !' या मुद्द्यावरून महायुती आणि महाआघाडीमध्ये 'मुख्यमंत्री संगीत खुर्चीचा खेळ' सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. महायुती मधून आगामी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची नावे आलटून पालटून चर्चेत असतात. शिंदे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असतील असा दावा करीत असतानाच, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते हे भावी मुख्यमंत्री म्हणून शहराशहरात अजित दादांचे पोस्टर लावताना दिसत होते.
तर देवेंद्र फडणवीस यांनी 'आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही चेहऱ्याशिवाय लढवली जाईल' असे सांगत असतानाच, भाजपामधून कधी, देश पातळीवरील राजकारणात व्यस्त असलेले, विनोद तिवडे तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत असते. तर कधी देवेंद्र फडणवीस यांचे नाव 'फायनल' झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून तसेच सोशल मीडियावरून पसरविल्या जातात.
इकडे महाआघाडीत शिवसेनेचे संजय राऊत वारंवार आगामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे गळ्याच्या नसा ताणून सांगत असतात. मध्येच नाना पटोले यांचे नाव चर्चेत येते. तर हळूच पवार कन्या सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची पुडी सोडली जाते. या पार्श्वभूमीवर आता महाआघाडीचे दिग्गज नेते मा. शरद पवार यांनी जाहीर भाषणातून जयंत पाटील हेच आगामी मुख्यमंत्री असल्याचे संकेत, इस्लामपूर येथे बोलताना दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'बाजारात तुरी भट भटणीला मारी' असे आपल्याकडे मराठीत म्हण आहे, त्याचे अत्यंत गेल्या काही महिन्यात जनतेला येत आहे. अद्याप कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार हेच गुलदस्त्यात असताना, मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून गुऱ्हाळ रंगले आहे.
इस्लामपूर येथे जयंतराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य संवाद यात्रेची सांगता काल संपन्न झाली. यासाठी एका जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सांगता समारंभ ऐवजी एक प्रकारे प्रचाराचा शुभारंभ यानिमित्ताने मा. शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मा. शरद पवार हे या सभेत काय घोषणा करणार, याकडे मतदारसंघाबरोबरच संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. मात्र पवारसाहेब काय काय मंत्र देतात की कुणाचे कान उपटतात ? असा सवाल, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसत होते. मात्र मा. पवार साहेबांनी चर्चेतील साऱ्याचं नावावर फुली मारून आ. जयंत पाटील यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे जाहीर भांडणातून सांगितल्याने, त्यांच्या डोक्यात आगामी मुख्यमंत्री म्हणून आ. जयंत पाटील यांचे नाव आहे का ? अशी चर्चा आता सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागली आहे.
मा. शरद पवार यांना आपल्या कन्येला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचे स्वप्न गुपित राहिलेले नाही. या न त्या कारणाने सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असते. विद्यमान उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आपल्या काकांचे स्वप्न आणि इरादा ओळखूनच त्यांची साथ सोडत अख्खा पक्ष आपल्या सोबत नेला.
मा. शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांना कळले नाही, त्यामुळे अमर उजाला या कवीचे पुढील ओळी आठवतात...
मैं जब बोलता हूं तो बगावत लगती है |
सच बोलूं तो सियासत लगती है।
हकीकत बयां करता हूं मैं अपने जहन की,
लोगों में फिर क्यों बौखलाहट लगती हैं।
त्यामुळे आता मा. शरद पवार यांनी भाषणातून टाकलेल्या गुगलीने राजकारणातील कोणाची दांडी गुल होणार, आणि कोण सत्तेचा बादशाह होणार याबाबत तर्कवितर्क झाले आहेत. खरी गंमत निवडणूक निकालानंतरच जनतेस पहावयास मिळणार आहे....