| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑक्टोबर २०२४
ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी झाली, त्या त्यावेळी त्याचा विरोधी पक्षांना फायदा झाला. आणि म्हणून यावेळी काँग्रेस पक्षाचा दोन वेळा आणि स्व. मदन भाऊंचा पराभव करणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन माझ्या पाठीशी उभे राहावे असे भावनिक आवाहन काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगली येथील जाहीर सभेतून केले.
आदरणीय जयश्री वहिनी या सांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत यात चुकीचे काही नाही असे सांगून पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, माझा मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला, माझी लढाई अंतर्गत नव्हती भाजपाशी होती, ज्या सुधीरदादा गाडगीळ यांनी मदनभाऊंचा पराभव केल्यानंतर मदनभाऊंचा एक शेजारी, बालपणाचा मित्र म्हणून मी अनुभवलं आहे. त्या सुधीरदादा गाडगीळ यांचा पराभव करायचा म्हणून मी तेव्हा निवडणुकीला उभा राहिलो. त्यावेळी भाजपाची, नरेंद्र मोदी यांची लाट होती, मला सांगितलं गेलं, कशाला निवडणुकीला उभे राहत आहे ? त्यामध्ये कोट्यावधी रुपये कशाला खर्च करता आहे ? दुसऱ्याला संधी द्या. परंतु मी लढणारा कार्यकर्ता आहे. सांगलीकरांच्या विश्वासाच्या जोरावर मी निवडणूक लढवली. परंतु माझा निसटता पराभव झाला. मला 86 हजार मत पडली आणखी तीन टक्के मत पडली असती तर मी तुमचा आमदार झालो असतो. परंतु मी घरात दुःख करत बसलो असतो तर त्या मतदारांची प्रतारणा होईल, म्हणून दुसऱ्या दिवशी आभार दौरा करणारा मी कार्यकर्ता आहे.
आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर आरोप करताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, सुधीरदादा गाडगीळ यांना कार्यसम्राट म्हणून संबोधले जाते. परंतु ते कार्यसम्राट नव्हे तर कार्यशून्य आमदार आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी विधानसभेत किती वेळा सांगलीच्या समस्या मांडल्या, प्रश्न विचारले ?... केवळ दोन पूल बांधले, काही रस्ते केले, गटारी बांधल्या म्हणून कोणी कार्यसम्राट होत नाही असा आरोप पृथ्वीराज बाबा पाटील यांनी यावेळी केला.
तत्पूर्वी सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन चा आशीर्वाद घेऊन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी भव्य रॅलीतून शक्ती प्रदर्शन केले. सांगलीतील प्रमुख मार्गावरून ही रॅली काँग्रेस कमिटी समोर आल्यानंतर तिथे जाहीर सभेत रूपांतर झाले.
यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, काही जणांनी टीका करीत होते की, पृथ्वीराज पाटलाच्या पाठीमागे केडर नाही, परंतु व्यासपीठावरील उपस्थित विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते हे केडर नाही का ? आज सकाळी निघालेल्या रॅलीमध्ये माझ्यावर प्रेम करणारे उपस्थित हजारो सांगलीकर उपस्थित राहिले, मला पाठिंबा दिला, याबद्दल मी सांगलीच्या जनतेला शत शत नमन करतो, असे म्हणून ते व्यासपीठावर नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या.
सांगलीतील लक्षवेधी रॅली
यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील पुढे म्हणाले की, मी एकटा नाही, इथं महिला आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, पत्रकारांनी मला नेहमीच पाठींबा दिला आहे, सर्वसामान्य अल्पसंख्यांकापासून, दलित, ओबीसी यांच्यासह सर्वच समाज घटकांनी गेले पाच वर्ष मला पाठिंबा दिला आहे.
1978 च्या आय काँग्रेस फुटली तेव्हा, पश्चिम महाराष्ट्रातून प्रमिलाकाकी चव्हाण आणि माझे वडील गुलाबराव पाटील हे दोनच खासदार होते. त्यावेळी हा धाडसी निर्णय होता. आमच्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचा त्रास आमच्या कुटुंबीयांना झाला, आमच्या घरावर दगडफेक झाली, आम्ही सरळ सोसले आहे. त्यांच्या विचाराचा वारसा मला मिळाला आहे अशी आठवण करून देत पृथ्वीराज पाटील म्हणाले की, माझ्याबद्दलचा अपप्रचार सुरू आहे, हा पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये जाणार, देवेंद्र फडणवीस यांना भेटले, परंतु निष्ठावंत काँग्रेसचे रक्त माझ्याच आहे, मी कधी स्वप्नातही विचार करणार नाही की भाजपमध्ये जायचं. माझ्यावर आरोप झाला त्याचे शल्य मनात आहे. परंतु मी संयम सोडला नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगलीकरांनी जसा एक इतिहास घडविला, केवळ सांगलीकरांनीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे 35 पेक्षा अधिक खासदार निवडून आले, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारशे पारचा नारा आणि त्यांचे स्वप्न धुळीला मिळवलं. आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी भाजपला उखडून टाकण्यासाठी मतदान केलं, याबद्दल काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. याही वेळी असाच इतिहास घडवायचा आहे.
श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी मोठ्या मनाने माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्वांनीच जयश्री ताईंना विधान परिषदेतून आमदार करण्याचा शब्द दिला आहे. तेव्हा आपसातील मतभेद विसरून मनभेद न होता, आपण एकसंघपणे या निवडणुकीत सामोरे जात, स्व. मदनभाऊंचा पराभव करणाऱ्या सुधीर गाडगीळ यांचा पराभव करूया असे आवाहन पृथ्वीराजबाबा पाटील यांनी यावेळी केले.
सभेच्या प्रारंभी अय्याजभाई नायकवडी, राहुल पवार, प्रा. सुकुमार कांबळे, शंभूराज काटकर, प्रताप पाटील, ज्योती अदाटे, करीम मिस्त्री आदी वक्त्यांनी विरोधकांवर टीका करीत काँग्रेस एकसंघ राखण्याचे आणि पृथ्वीराजबाबा पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस व पृथ्वीराज बाबा पाटील प्रेमी नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणे होते. सुरुवातीस प्रा. एन डी बिरनाळे यांनी प्रास्ताविक केले.