| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक होत असलेल्या महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुली यांच्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे पोलीस यंत्रणा व राज्य सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीकेचा भडीमार होत असताना, पुणे पोलिसांनी केलेला गुन्हेगारांचा तपास कौतुकाचा विषय ठरत आहे. पण गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यासाठी त्यांनी कसा कसा तपास केला ? यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले हा सध्या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमध्ये सत्तेचा विषय ठरला आहे. घडलेली घटना आणि पोलिसांचा सर्वंकष तपास याच बाबतचा हा वृत्तांत...
आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी या परिसरातून सी.सी.टी.व्ही. मध्ये आपण येणार नाही याची दक्षता घेतली होती. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच तब्बल 700 पोलीस आणि वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रीचा दिवस करीत होते. घटनास्थळावरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले, साडेचारशे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी झाली. परंतु आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले होते. आणि म्हणूनच शेवटी पोलिसांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले.
पुणे पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून फरार आरोपींचे रेखाचित्र तयार केले होते. त्याआधारे तपास सुरू केला. आरोपीचे रेखाचित्र देखील तयार करण्यात आले. यासोबत सीसीटीव्ही फुटेजचा तपासात मोठा फायदा झाला. या प्रकरणातील सर्व आरोपी गुन्हेगार असल्याचे देखील समोर आले आहे. त्यांच्याविरोधात इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता. गुरुवारी दुपारनंतर आरोपींचे ठळक सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांना मिळाले. त्यानंतर हे फुटेज पीडित मुलीच्या मित्राला दाखवण्यात आले. त्याने यातील आरोपींना ओळखलं आणि त्यास तातडीने पुणे पोलिसांनी ताब्यातही घेतलं. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे 'एआय'तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण करण्यात आले.
बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांच्या तावडीतून कसा बचाव करायचा याची त्यांना माहिती होती. सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्य रस्ते चुकवत हे आरोपी फिरत होते. शेवटी गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढला. यातील एक आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित दोन आरोपींना नागपूर मधून ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अटकेत असलेला आरोपी मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी असून चार वर्षांपूर्वी तो पुणे शहरात उपजीविका भागवण्यासाठी आला होता. गेल्या चार वर्षापासून तो पुणे शहरातील उंड्री येथील कडनगर परिसरात राहतो. आरोपी हे पुणे शहरात मोलमजुरी करण्याचे काम करायचे. मध्य प्रदेशात त्यांच्यावर चोरी आणि लुटमारीचे गुन्हे देखील दाखल आहेत. पुण्याच्या बोपदेव घाट प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सामुदायिक सहकार्याने संशयित आरोपींना ओळखण्यात आणि पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेलीय.