Sangli Samachar

The Janshakti News

गणपती, नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, संभाजीराव भिडे गुरुजी यांची टीका !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑक्टोबर २०२४
प्रखर हिंदुत्ववादी तरुणांचे हृदयस्थ व्यक्तीमत्व म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख, श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांची सर्वदूर ख्याती. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस. सर्वच उच्च पदस्थांना सुरक्षा कवच भेदून थेट जाऊन भेटणारे. पण आपल्या बेधडक वक्तव्याने ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहतात. अनेकदा त्यांच्यावर पोलीसात गुन्हाही दाखल झाला आहे. अर्थात एकाही गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली नाही हेही नमूद करण्यासारखे. संभाजी गुरुजी हे समाजातील त्रुटीवर, चुकीच्या घटनांवर कोणाचाही, कुठलाही मुलाहिजा न ठेवता, जे आपल्याला पटते ते बिनधास्त बोलत असतात.

आज सकाळी दुर्गामाता दौंड शुभारंभ प्रसंगी जमलेल्या शिवभक्तांसमोर, गणपती व नवरात्रोत्सव बाबतीत असेच वक्तव्य करून हिंदू समाजाची दिशा बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना भिडे गुरुजी पुढे म्हणाले की, गणपती आणि नवरात्र उत्सव सध्या इव्हेंट मध्ये बदलले आहेत. गणपती उत्सवाचा सध्या चोथा झाला असून नवरात्र उत्सवात होणाऱ्या दांडिया व मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे हिंदू समाजाला गोंधळात टाकले जात आहे. आपण हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची गरज त्यानी व्यक्त केली.


छत्रपती शिवरायांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनवण्याचा मार्ग शिकवला. परंतु आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकतो आहे. परंतु यावेळी त्यांनी आपण नवरात्रीचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले.

प्रतिवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते माधवनगर रस्त्यावरील दुर्गा माता मंदिरापर्यंत दौडीचे आयोजन केले जाते. यावेळी शेकडो तरुण-तरुणी यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात. दर दिवशी सांगली शहरातील वेगवेगळ्या मार्गाने ही दौड पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास जवळ येते आणि त्याची सांगता होते. प्रतिवर्षी कोणताही कटू प्रसंग न घडता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही दौड संपन्न होत असते.