Sangli Samachar

The Janshakti News

घाईघाईने घेतलेले निर्णय शिंदे सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता, निवडणूक आयोगाने धाडली नोटीस !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या महिन्याभरात शिंदे सरकारने लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा धडाका लावला होता. मात्र निवडणूक नियमाप्रमाणे आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही घोषणा सरकारतर्फे जाहीर करता येत नाही. काल निवडणूक आयोगाचे घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नव्याने काही घोषणा जाहीर झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.

विरोधकांनी शिंदे सरकारला या प्रकरणावरून घेण्यापूर्वीच आयोगाने सरकारला या शासकीय वेबसाईटवरील घोषणाबाबत चौकशी केली, आणि त्याचवेळी वेबसाईटवरून या घोषणा हटवण्यात आल्या. तसेच सदरच्या घोषणा जुन्याच असून त्या चुकून वेबसाईटवर अपलोड झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. मात्र तरीही याबाबत अधिकृत खुलासा करण्याचे नोटीस निवडणूक आयोगाकडून शिंदे सरकारला पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


गेल्या महिन्याभरात शिंदे सरकार कडून अनेकानेक योजना जाहीर झाल्या होत्या. प्रत्यक्ष लाभ महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला होणार आहे. याबाबतही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून केवळ आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या लोकप्रिय योजना सादर केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तर अशा लोकप्रिय योजना निवडणुकीच्या तोंडावरच यापूर्वीही गत सरकारच्या काळात जाहीर झाल्या असल्याचा पलटवार शिंदे सरकारातील नेत्याने लगावला आहे.

आता निवडणूक आयोग काल शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलेल्या योजना बाबत काही कारवाई करणार का ? असा सवाल विरोधकांनी केला आहे. मात्र अद्याप याबाबत ना सरकारकडून काही खुलासा आला आहे ना निवडणूक आयोगाकडून.. त्यामुळे याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.