yuva MAharashtra आजपासून 'संपर्क क्रांती रेल्वे' सांगली, किर्लोस्करवाडीत थांबणार, नागरिक जागृती मंचच्या अभियानाला यश !

आजपासून 'संपर्क क्रांती रेल्वे' सांगली, किर्लोस्करवाडीत थांबणार, नागरिक जागृती मंचच्या अभियानाला यश !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
गेल्या पाच वर्षापासून संपर्क क्रांतीला सांगली व किर्लोस्करवाडीत थांबा मिळावा म्हणून नागरिक जागृती मंचच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्यात आला. जागृती मंचच्या या प्रयत्नांना यश आले असून, आज पासून सांगलीत संपर्क क्रांति रेल्वे थांबणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ही दोन्ही रेल्वे स्टेशन्स अत्यंत महत्त्वाची मानली जातात. सांगली हे व्यापारी दृष्टिकोनातून तर किर्लोस्करवाडी हे औद्योगिक नागरी म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी संख्या आहे. संपर्क क्रांती प्रमाणेच गोवा एक्सप्रेस ही दिल्लीस जाणारी सुपरफास्ट रेल्वे थांबविण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र रेल्वे मंत्रालयाकडून या मागणीला केवळ आश्वासाला पलीकडे काही न मिळता, वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या. 


संपर्क क्रांती सुरू झाल्यानंतर अठरा वर्षानंतर सांगली रेल्वे स्टेशनला अखेर न्याय मिळाला असून आजपासून ही रेल्वे सांगलीत थांबणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सैनिकाला आता देशाच्या सीमेवर रक्षा करण्यास जाण्यासाठी हरियाणा व पंजाब पर्यंत रेल्वे गाडी उपलब्ध होणार आहे. या रेल्वेमधून जवानांप्रमाणेच व्यापारी व उद्योजकांची, त्याचप्रमाणे विविध कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांची ही गर्दी असते. किर्लोस्करवाडीत आता संपर्क क्रांती थांबणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे.


सांगलीतील प्रवाशांची मागणी पूर्ण केल्यामुळे सांगली जिल्हा नागरी जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेश भाऊ खाडे तसेच सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे आभार मानले आहेत.