| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑक्टोबर २०२४
पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना सांगली महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सांगली मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे. आज १ऑक्टोबर २०२४ रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत सकाळी १०:३० ते ५:००, या वेळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमांमध्ये मुख्य कार्यक्रम हा पद्मश्री मुरली कांत राजाराम पेटकर सन्मानित करण्याच्या असणार आहे,
श्री. शुभम गुप्ता यांनी स्वच्छता ही सेवा अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने अनेक कार्यक्रम आयोजन करण्यात पुढाकार घेऊन नियोजन केले आहे. उप आयुक्त वैभव साबळे यांनी दि १९/९ ते २/१० या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, अति. आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त शिल्पा दरेकर, विजया यादव, सहा. आयुक्त आणि अधिकारी यांनी स्वच्छता ही सेवा हे अभियान यशस्वीपणे राबविले आहे.
२० मार्च २०१८ साली श्री. पेटकर यांना माननीय राष्ट्रपती श्री. कोविंदजी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अनेक मानसन्मानाने गौरवण्यात आले आहे.
पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांना ५० मी. फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता होण्याचा गौरव प्राप्त झाला आहे. जर्मनीमधील हेडलबर्ग येथे १९७२ मध्ये झालेल्या ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धेमध्ये श्री. पेटकरांना हा विजय प्राप्त झाला. याच स्पर्धेत त्यांनी फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा एक नवा विश्वविक्रम स्वतःच्या नावे प्रस्थापित केला होता.
१ नोव्हेंबर १९४७ साली श्री. पेटकरांचा जन्म पेठ इस्लामपूर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे झाला. श्री. पेटकरांनी शालेय जीवनातच कुस्ती, हॉकी आणि मैदानी खेळात चमक दाखवून आपले खेळाविषयीचे प्रेम निदर्शनास आणले होते. पुणे येथे भारतीय सैन्यदलातील मुलांच्या तुकडीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट खेळाडू अशी स्वतःची ओळख निर्माण केली. प्रत्येक खेळात प्राविण्य मिळवले. १९६४ साली जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीटमध्ये भारतीय सैन्यदलातर्फे बॉक्सिंग या खेळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.
युद्धात अनुभवलेल्या भयानक परिणामानंतरही श्री. पेटकरांनी कधी मागे वळून पाहिले नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या स्टोक मेंडेविल आंतरराष्ट्रीय पॅराप्लेजीक क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेतला. ज्यात त्यांनी स्वतःचेच विक्रम मोडत सलग ५ वर्षे (१९६९-७३) सर्वसाधारण अजिंक्यपद मिळविले. स्कॉटलंड येथील एडिनबर्ग येथे झालेल्या राष्ट्रमंडळ पॅराप्लेजीक क्रीडास्पर्धेत त्यांनी ५० मी. फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक, भालाफेकीत रौप्यपदक आणि गोळाफेकीत कांस्यपदक मिळविले. १९८२ साली हाँगकाँग येथे आयोजित FESPIC. क्रीडास्पर्धेत ५० मी. जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक आणि गोळाफेकीत कांस्यपदक मिळविले. असे काही उल्लेखनीय विजय त्यांनी प्राप्त केले आहेत.
जर्मनीत झालेली ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा ही श्री. पेटकर यांच्या क्रीडाक्षेत्रातील एक असामान्य आणि महत्त्वाची घटना म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युद्धात गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊनही त्यांच्या क्रीडाक्षेत्राच्या प्रगतीत कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी अतिशय धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढाईत मैदान गाजविले. भारतीय सैन्यदलात सियालकोट (जम्मू-काश्मीर) येथे तैनात असताना, १९६५ साली भारत पाकिस्तान युद्धाचा सामना करावा लागला. या युद्धात त्यांना बंदुकीच्या गोळ्यांचा मारा सहन करावा लागला आणि त्यांना स्मृतिभ्रंशही झाला.
या सर्व घटनेची साक्षीदार म्हणून आजही त्यांच्या मणक्यात एक बंदुकीची गोळी आहे. अशा सगळ्या परिस्थितीत, आयुष्यात अनिश्चितता आणि नैराश्य पसरले असतानाही श्री. पेटकर यांनी एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे, १९६७ च्या राज्य क्रीडास्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी झेप घेतली. या स्पर्धेत त्यांना गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, टेबलटेनिस आणि धनुर्विद्या या क्रीडाप्रकारात महाराष्ट्र राज्याचे अजिंक्यपद मिळाले. त्यानंतर श्री. पेटकरांच्या क्रीडाक्षेत्रातील प्रगतीचा आलेख उंचावतच गेला.
क्रीडाक्षेत्रातील श्री. पेटकर यांच्या अतुलनीय आणि निष्ठापूर्वक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय क्रीडाक्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले.
१९७५ साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल नवाब अली यावर जंग यांच्या हस्ते श्री. पेटकर यांना, महाराष्ट्राचा क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च असा श्री. शिव छत्रपती पुरस्कार दिला गेला. तसेच १९६५ साली श्री. पेटकरांना रक्षा पदक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.
अशा विशाल व्यक्तिमत्त्वाचा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने ब्रँड अँबेसिडर म्हणून सन्मान सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
दि २/१०/२०२४ रोजी देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, या मध्ये महा स्वच्छता देखील होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री. आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.