| सांगली समाचार वृत्त |
इंदापूर - दि. ११ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभेचे मैदान कोणत्याही परिस्थितीत मारायचेच या इराद्याने रणांगणात उतरलेल्या शरद पवारांना पक्षातील 'इन कमिंग' चा निर्णय महागात पडण्याची चिन्हे दिसून येत असून, याची सुरुवात त्यांची होम पीच बारामतीच्या शेजारील इंदापुरातूनच झाली आहे. अगदी दोनच दिवसापूर्वी भाजपमधून 'राष्ट्रवादीवासी' झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. आणि याचा फटका विधानसभेला बसू शकतो.
इंदापुरातील बरे प्रस्थ आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत. कोणतीही निवडणूक असो, आज पर्यंत राष्ट्रवादीसाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. परंतु हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाने ते अस्वस्थ आहेत. ती तर पदाधिकाऱ्यांची ही मनस्थिती वेगळी नाही. आजच जगदाळे यांनी परिवर्तन मेळावा घेऊन शरद पवार व सुप्रिया सुळे यांना बंडखोरीचा इशारा दिला आहे.
यावेळी जाहीर भाषणात बोलताना ते म्हणाले की, तुम्ही निर्णय बदला नाहीतर बंडखोरी परवडणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात हे मोहन उठेल. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला होता, त्याच मैदानावर भलीमोठी सभा घेऊन त्यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले आहे.
यावेळी बोलताना आप्पासाहेब जगदाळे पुढे म्हणाले की परवाच्या सभेत एक हजार खुर्च्या परत न्याव्या लागल्या. आम्ही मंडप तोच ठेवलाय फक्त खुर्च्या वाढवले आहेत, असे ते म्हणाले. आम्ही रोखठोक कामे करणारे कार्यकर्ते आहोत तालुकेतील अधिकारी कामे कसे करीत नाहीत ते आम्ही पाहणार आहोत असा इशाराही यावेळी जगदाळे यांनी दिला. 'सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता' या हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना जगदाळे म्हणाले की, हा अदृश्य हात काय असतो ? तो मागून शिक्का मारतो का पुढून ? या त्यांच्या वक्तव्यावरून उपस्थिततांमधून हास्याच्या कारंजा उडाल्या.
हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, 2014 साली आधी मला सांगितलं, 'मी लढणार नाही.' परंतु फॉर्म भरण्याच्या चारच दिवस आधी ते म्हणाले, 'मी लई पळालो, आता मलाच लढायचं आहे.' आम्ही सारे नाराज झालो. परंतु पक्ष नेतृत्वाने आमची समजूत काढली. त्यांच्याकडे पाहून आम्ही ही गोष्ट पचवली. परंतु 2019 मध्ये पुन्हा तोच कित्ता. यावेळीही आमचा विश्वासघात केला, असा घणाघात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल बोलताना केला.
आम्ही काय करावं हे जनतेने आम्हाला सांगायचं आहे. उद्याची निवडणूक इंदापूरच्या परिवर्तनाची आहे, असे आवाहन करून आप्पासाहेब जगदाळे पुढे म्हणाले की, आता इंदापूर सरांची आम्हाला साथ हवी आहे. शरद पवार आणि सुप्रिया ताईंना जर या जनतेवर प्रेम असेल तर त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा. इंदापूर ची बंडखोरी परवडणारे नाही. हे मोहोळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. त्यामुळे घाई गडबडीचा निर्णय चुकीचा ठरू नये, असेही यावेळी जगदाळे यांनी इशारा देताना सांगितले.
त्यामुळे आता शरद पवार गटापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून उमेदवार निवडताना शरद पवार यांच्याबरोबरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची दमचाक होणार आहे. केवळ इंदापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हेच चित्र दिसून येत आहे. आता या 'बंडोबांना' राजकारणात मुरब्बी असलेले शरद पवार कसे थंडोबा करतात ? याचे उत्तर येणारा काळच देईल.