Sangli Samachar

The Janshakti News

महिला उन्नती व शहर विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेणार - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑक्टोबर २०२४
महिलांना स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षणाची संधी आणि गृहउद्योगाची संधी उपलब्ध होण्यासाठी, त्या आत्मनिर्भर व निर्भय होऊन, सुरक्षित राहण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे. महिलांच्या सन्मानासाठी मी कटीबध्द आहे. असे उदगार पृथ्वीराजबाबा पाटील यांनी काढले. संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत 'करदर्शनम सांगलीचा नवरात्रोत्सव' या कार्यक्रम स्थळी आयोजित संवाद सांगलीसाठी या खास महिलासांठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, देशाच्या-समाजाच्या आणि कुटुंबाच्या विकासात महिलांचे लक्षवेधी योगदान असते. महिलांच्या व सांगलीच्या समस्या जाणून घेऊन भविष्यात सांगली कशी असावी याबाबत त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत संवाद महिलासांठी कार्यक्रम घेतला आहे. असे त्यांनी सांगितले.


पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले की, महिला आता जागृत झाल्या आहेत. मोकळेपणाने आपल्या व शहराच्या समस्या मांडतात, हे सांगलीच्या विकासासाठी आवश्यक आहे. यावेळी युवती, महिलांना व सांगलीला भेडसावणाऱ्या समस्यांबरोबर भविष्यात सांगली कशी असावी ? याबाबत त्यांच्याशी चर्चा करुन महिला व युवतींच्या समस्या अग्रक्रमाने सोडवणार असल्याची हमी दिली.

प्रारंभी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

या महिला संवाद कार्यक्रमात सौ. विजया पृथ्वीराज पाटील, डॉ. जयश्री पाटील, योगिता एडेकर, आशाताई पाटील, प्रणिता पवार, ॲड. धनश्री कोरे, किर्ती देशमुख, डॉ. तजीन बिडीवाले, विशाखा पाटील, मिनाक्षी दुगे, जयश्री घोरपडे, सुरेखा मिरजकर, सुनिता शेरीकर, सुनिता वांडरे, सुप्रिया शिंदे बेडग, पूनम सारडा इ. महिलांनी रस्ते, गटारी, पार्किंग, महिला सुरक्षितता, महिला कायद्याचे ज्ञान, महिला उद्योग व रोजगार, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक उपाय, उद्याने व मैदाने विकास, अद्ययावत नाट्यगृह इ. मुद्दे मांडले व पृथ्वीराज पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून समस्या सोडविण्यासाठी सक्षम असल्याचे मत मांडले. आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. 

या कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील फौंडेशन संचलित कृष्णाई महिला मंच आयोजित घरगुती गोरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पृथ्वीराज व सौ. विजया पृथ्वीराज पाटील आणि मान्यवर महिलांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. सुशिला जाधव या ८० वर्षीय जेष्ठ महिलेने पांडुरंग स्तुती गीत गायले. यावेळी युवती, महिला व सांगलीकर स्त्री-पुरुषांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले.