| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑक्टोबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका प्राथ. शाळा क्र. 29, सांगली या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दि १७/१०/२०२४ रोजी श्रीमती विजया सुरेश शिंगाडे, सहा, शिक्षिका यांचेकडून विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत संतप्त पालक व विदयार्थी यांनी तक्रार केलेली होती. या मारहाणीचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर नागरिकातून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली.
मा. विजया यादव उपायुक्त . सचिन सागावकर, सहा. आयुक्त, श्री. रंगराव आठवले, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी सदर तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी चौकशी केली. सदर चौकशीमध्ये विदयार्थ्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले.
ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने मा आयुक्त यांनी नोंद घेऊन मुख्याध्यापक श्री मारुती माळी यांची बदली तर विजया सुरेश शिंगाडे सहा. शिक्षिका यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शाळा प्रशासनास सूचना देऊन शालेय कामकाजात कोणत्याही प्रकारे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, शालेय कामकाज नियमाने आणि शिस्तीत होणे आवश्यक आहे, त्याकामी प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समन्वय साधून कामकाजात सुधारणा करावी अशी सूचना देखील दिली आहे.
काही दिवसापूर्वी सांगली शहरात महापालिका शाळा क्रमांक 29 मधील, चौथीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना हातावर व उठेपर्यंत श्रीमती विजया शिंगारे या शिक्षिकेने मारहाण केली होती. ही बाब पालकांना समजतात, त्यांनी सदर शाळेत येऊन, श्रीमती शिंगाडे व मुख्याध्यापक मारुती माळी यांना जाब विचारला. व महापालिका आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांच्याकडेही तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन, त्यांनी तात्काळ संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केल्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याच वेळी यापुढे सदर शाळेत अथवा महापालिका क्षेत्रातील अन्य शाळेत मुलांवर अशा पद्धतीने मारहाणीचे प्रकार घडले तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काही पालकांनी दिला आहे.