| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २७ ऑक्टोबर २०२४
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाआघाडीकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केले जात आहे. मात्र या यादीत आमदारकीचे डोहाळे लागलेल्या इच्छुकांची नावे नसल्याने, अनेकांनी बंडखोरी साठी दंड थोपटले आहेत. बंडाचे हे लोण सांगली जिल्ह्यातही पोहोचले असून, सांगली, जत पाठोपाठ आता शिराळा विधानसभा मतदारसंघातही इच्छुक उमेदवार सम्राट महाडिक यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानसिंगराव नाईक हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाकडून सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. काल भाजपाच्या जाहीर झालेल्या यादीत सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे महाडिक गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान, आज महाडिक गटाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात महाडिक गटाकडून निवडणूक लढवण्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केला.
मेळाव्यानंतर भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी माध्यमांना आपली भूमिका सांगितली. यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले, आज झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या दहा वर्षापासून आम्ही आणि आमचे कार्यकर्ते या मतदारसंघात काम करत आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी भाजपाची राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्हाला पक्षश्रेष्ठींना तिकीट देण्याचा शब्द दिला होता. त्यावर आम्ही प्रवेश केला, पाच वर्षात आम्ही पक्ष वाढवण्याचे काम केले. शब्द पाळला नसल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा तीव्र आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. उद्या आम्ही अपक्ष अर्ज दाखल करणार आहे, असेही सम्राट महाडिक म्हणाले.
भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शिराळा विधानसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महाडिक गटाची मोठी ताकद आहे. यामुळे दोन्ही मतदारसंघात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.