| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑक्टोबर २०२४
लोकप्रतिनिधींनी बोलायचं आणि जनतेनं ऐकायचं यामुळे जनतेचे प्रश्न जैसे थे राहतात. जनतेनं आपल्या समस्या हक्कानं मांडायच्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून ऐकून त्या सोडविण्यासाठी विधानसभेत जायचं असतं, यावर माझा दृढ विश्वास आहे, म्हणून आम्ही पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने 'संवाद सांगलीसाठी' या उपक्रमांतर्गत सांगलीतील विविध घटकांना समक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी व भविष्यात सांगली कशी असावी याबाबत नागरिकांची मते जाणून घेत आहोत. असे प्रतिपादन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. सांगलीत टिळक स्मारक मंदिरात आयोजित 'संवाद सांगलीसाठी'या उपक्रमांतर्गत आज ते व्यापाऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या समस्या या सांगली शहराच्या समस्या आहेत. त्यांचे निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधीला केवळ याची जाणीव असून भागणार नाही, तर त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी उत्तरदायित्व स्विकारुन विधीमंडळात आवाज उठवण्याचे काम करणे आवश्यक आहे. सांगलीच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर आहेत. त्या सोडवण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. व्यापाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून व्यापारी पेठ समस्यामुक्त करण्यासाठी माझा अग्रक्रम राहील, असे आश्वासन पृथ्वीराज बाबा पाटील यांनी दिले.
माझ्या पाठीशी रहा. मी सांगलीचा व्यापार आणि व्यापाऱ्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी कटीबध्द राहीन. आपल्या समस्यांची नोंद घेतली असून त्यांचा मी माझ्या वैयक्तिक संकल्पनाम्यात समावेश करुन त्यांचे निराकरण करण्यासाठी माझी शक्ती खर्च करणार आहे, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
प्रारंभी दिपप्रज्वलन व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चेतन दडगे, गणेश जोशी, संदीप पाटील, सावकार शिराळे, आनंद गोटखिंडे, प्राचार्य निलेश भंडारे, चंद्रकांत पाटील, समीरभाई व अतुलभाई शहा व अशोक मालवणकर यांनी शनिवार बाजारामुळे व्यापारी वर्गाची होणारी घुसमट व्यक्त करताना, बाजार स्थलांतर, पार्किंग व्यवस्था व वहातूक नियंत्रण, व्यापारी वर्गाची प्रशासनाकडून होणारी अडवणूक, बांधकाम परवाना विलंब, नवीन पुलामुळे निर्माण होणारी वहातूक समस्या, स्वच्छता गृहाची अडचण, एकेरी वाहतूक, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या व इतर अडचणींचा पाढाच वाचला.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीचा आमदार म्हणून संधी दिल्यास व्यापारी पेठ समस्यामुक्त करण्यासाठी झटेन. व्यापारवृध्दी आणि व्यापारी यांचा सन्मान यासाठी काम करणार असे आश्वस्त केले.
स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. यावेळी हरभट रोड, दत्त-मारुती रोड, कापड पेठ व व्यापारी पेठेतील व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.