Sangli Samachar

The Janshakti News

पाच कोटी रुपये सापडलेल्या गाडीचा मालक म्हणतो "तो मी नव्हेच" ! आ. शहाजी बापू म्हणतात माझा काय संबंध ?


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षाची धांदल सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर करण्यापासून प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत सर्वच पातळीवर वाढती रेलचेल दिसून येत आहे. आता निवडणूक म्हटलं की पैशाचा खेळ ! परंतु गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सजग झाले असून, अवैध मार्गाने निवडणुकीत 'पैशाचा खेळ' होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असते. परिणामी अनेक ठिकाणी अशी बेनामी रक्कम सापडल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आले आहेत.

काल पुण्यातील खेड शिवापुर परिसरात एका गाडीतून पोलिसांनी पाच कोटी रुपयाची रक्कम जप्त केली राजकीय वातावरण ढवळून निघाले. ज्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली, ती सोलापूर पासिंगची असून तिचे कनेक्शन शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी जुळले. आणि संशयाची सुई साहजिकच शहाजीबापूंकडे वळली.


यामुळे शिंदे गटाच्या विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ. शहाजीबापू पाटील यांना टार्गेट केले आहे. परंतु शहाजी बापूंनी या रकमेची अथवा जप्त केलेल्या कारचे आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर ज्याच्या नावावर कार आहे, त्या अमोल नलावडे यांनी आपण ही कार बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली असल्याचा खुलासा केला आहे. मी पोलिसांना चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असेही नलावडे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता ही कार नेमकी कोणाची ? ती त्यातील रक्कम नेमके कशासाठी वापरली जाणार होती ? याचा माग आता पोलीस काढत आहेत. ज्यांना या गाडीतून ताब्यात घेण्यात आले होते, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण बांधकाम व्यवसायातील असून, ही रक्कम एका व्यवहारासाठी घेऊन जात असल्याचा खुलासा केला होता. संबंधित व्यक्तींना पोलिसांनी जबाब घेऊन सोडले असले तरी, त्यांना चौकशीसाठी पुन्हा केव्हाही ताब्यात घेण्यात येऊ शकते असे म्हटले आहे. परंतु सदर पाच कोटी रुपये रकमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आता पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.