Sangli Samachar

The Janshakti News

जयंत पाटील यांच्याकडे काँग्रेसने प्रचारासाठी ठेवली अट, जयंतराव यांच्या निर्णयाकडे लक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. ११ ऑक्टोबर २०२४
जयंतराव पाटील हे केवळ सांगली जिल्ह्यातील तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक बढं प्रस्थ. आपल्या 'करेक्ट कार्यक्रमामुळे' ते सर्वदूर परिचित. याच त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्येमुळे राजकारणात त्यांच्या वाट्याला कोण जात नव्हते. परंतु परिस्थिती नेहमी एकसारखी राहत नाही. त्यांच्या बदलत्या राजकीय निर्णयामुळे त्यांनी अनेक राजकीय विरोधक निर्माण केले. आणि आता हीच त्यांची राजकीय विरोधक त्यांच्या वाटचालीतील काटे बनत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात सर्वच गट, पक्ष एकत्र आल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पक्ष निरीक्षक व आंध्र प्रदेशचे माजी मंत्री डॉ. साके शैलजाथ व सह निरीक्षक शशांक बावचकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठेवलेली अट मतदार संघात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडे ठेवला आहे. ही जागा व इमारत काँग्रेस पक्षाला परत केली, तरच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा प्रचार करतील, असे यावेळी सांगण्यात आले.


1999 साली काँग्रेस पक्षामधून बाहेर पडून मा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर, सांगलीतील काँग्रेस मधील ज्या नेत्यांनी त्यावेळी मा. शरद पवार यांना साथ देण्याचे ठरवले होते त्यामध्ये आ. जयंत पाटील हेही होते. या निर्णयाचा फायदाही झाला. मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती त्यांच्या वाट्याला आली. शिवाय महत्त्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष पदही त्यांच्याकडे आले.

यावेळी आ. जयंत पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या इमारतीवर ताबा मिळवला. कागदोपत्री ही जागा जरी काँग्रेस पक्षाच्या नावावर असली, तरी आजही राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतरही आ. जयंत पाटील गटाकडेच आहे. त्यामुळे विरोधकांनी घेरलेल्या आ. जयंत पाटलांसमोर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे, आता आ. जयंत पाटील व त्यांचा गट काय निर्णय घेतो, याकडे मतदार संघाचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.