| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे, काही इच्छुक नाराज झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. त्यामुळे भाजपचे संकट मोचक चंद्रकांतदादा पाटील हे या नाराजांची समजूत काढण्यासाठी सांगलीत दाखल झाले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की, सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला पोषक वातावरण आहे. त्यामुळे कोणीही नाराज न होता पक्षादेश मानून, सुधीरदादांच्या विजयासाठी कामाला लागायचे आहे. यावेळी सुधीरदादा हॅट्रिक साधणार असा विश्वासही चंद्रकांतदादांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार शेखर इनामदार, माजी आमदार दिनकरतात्या पाटील माजी आमदार नितीन शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार, सांगली महापालिकेचे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, भाजपच्या महिला नेत्या नीता केळकर यांची त्यांच्या घरी जाऊन चंद्रकांत दादांनी भेट घेतली.
यावेळी सर्वांनी नाराजी सोडून भाजप महायुतीचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. सांगली विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे भाजपमधून विधानसभेसाठी शेखर इनामदार, पै. पृथ्वीराज पवार, दिनकर तात्या पाटील, शिवाजी तथा पप्पू डोंगरे, माजी आमदार नितीन शिंदे, धीरज सूर्यवंशी, प्रकाश ढंग, निताताई केळकर, ॲड. स्वातीताई शिंदे, इत्यादी मंडळी इच्छुक होती. परंतु सांगली विधानसभेचा ग्राउंड रिपोर्ट सुधीरदादांच्याच बाजूचा असल्याने राज्य नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवला व उमेदवारी देण्यात आली.
यावेळी नाराज असलेल्यांना पक्षातील विविध पदे देऊन पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने धाडले आहे.
पदाधिकाऱ्यांची नावे आणि दिलेले पदे अशी...
शेखर इनामदार - प्रदेश उपाध्यक्ष
दीपक शिंदे - जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)
धीरज सूर्यवंशी - प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा
दरम्यान विद्यमान आमदार व भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रचाराचा झंजावात निर्माण केला आहे. समाजातील विविध घटकांना भेटून त्यांच्या सदिच्छा घेण्यासाठी ते शहरातील विविध भागात भेटी देत आहेत. यावेळी त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता, सुधीरदादा हॅट्रिक करणारच असा विश्वास जनतेतूनच व्यक्त होत आहे.