Sangli Samachar

The Janshakti News

महाविकास आघाडीत मतभेद कायम, अंतिम यादी जाहीर होण्यास विलंब; जागा कमी मिळाल्याने राहुल गांधी नाराज !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ ऑक्टोबर २०२
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील जागा वाटपाचे मतभेद कायम आहेत. यावर अद्याप तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली नाही, आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रात काँग्रेसला जागा कमी मिळाल्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विदर्भातील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत अद्याप टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे दुसरी यादी जाहीर करण्यास वेळ लागत आहे. आता सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस अर्ज दाखल करण्यास मुदत असल्याने शनिवार, रविवारी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केले आहे. मित्रपक्षांना आम्ही १८ जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला ८५-८५-८५ वरुन ९०-९०-९० वर पोहोचला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब बोरात म्हणाले की, काही ठिकाणी 'सांगली पॅटर्न प्रमाणे जागा लढविण्याचा प्रस्ताव पुढे येत असला तरी या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच निवडणूक झाली पाहिजे, असे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले आहे.

आम्ही चर्चा करत आहोत, आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्याचाबत चर्चा झाली आहे. सीईसी पुढे ही नाव आम्ही ठेवणार आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत कोठेही करणार नाही, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्याची निवडणूक आहे, त्यामुळे काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटले की, १८ जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत. त्यातून किती सुटतील बघू असे देखील ते म्हणाले. आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाला आहे. काँग्रेस १०० च्या पुढे जाणार का याची अजून बेरीज केली नाही, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने काल पहिल्यांदा ४८ जागांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून कालपर्यंत १५८ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ६५ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच जागांवर सीईसी मध्ये शिकामोर्तब होईल, पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे सांगितले. आज ५५ जागांवर चर्चा झाली आहे. मैत्रीपूर्ण लढतींचा अद्याप निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीसांना किती समजतं माहित नाही, असा टोला देखील पटोले यांनी लगावला.