| सांगली समाचार वृत्त |
गेवराई - दि. ७ ऑक्टोबर २०२४
समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात लोकहितासाठी भूमिका मांडण्याचे काम पत्रकारांचे आहे. यासाठी प्रिंट मीडिया जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा भविष्यात डिजिटल मीडिया असणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी डिजिटल मीडियामध्ये अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.
गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी अभा मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या सदस्यांचा मेळावा आणि नूतन पदाधिकारी सत्कार सोहळ्याची आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस. एम. देशमुख बोलत होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचे चुकत असेल तर ते चूक म्हणण्याची भूमिका पत्रकारांनी ठेवावी आणि जनतेचा आवाज होऊन प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाने काम करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल सोळुंके, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, संपादक सर्वोत्तम गावस्कर, राज्य सरकारच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल महाजन, डिजिटल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश इंगावले, मराठा पत्रकार परिषद जिल्हा सचिव राजेंद्र बरकसे, जिल्हाउपाध्यक्ष जुनेद बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल वाघमारे यांचा उपस्थितीत मान्यवर आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डिजिटल मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी दिनकर शिंदे यांची निवड जाहीर करून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना एस एम देशमुख पुढे म्हणाले की, काळ बदलत आहे तशा पद्धतीने पत्रकारांनीही आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे. आजच इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपले स्वतंत्र युट्यूब चॅनल सुरू केले आहे. तर काही दैनिक आणि पत्रकार यांनी सुद्धा आपले युट्युब चॅनल सुरू केले आहेत. भविष्यात प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात टिकायचे असेल तर पत्रकारांनी डिजिटल मीडियामध्ये सहभागी होऊन सक्रियपणे काम करावे.
यावेळी बोलताना एस. एम. देशमुख पुढे म्हणाले की, विविध न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. त्यासोबतच आता डिजिटल मीडिया ही आपल्याच ताब्यात राहावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. ते आम्हाला मान्य नाही म्हणूनच मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद याचा तीव्र विरोध करत आहे. राज्यातले सरकार स्वतःच्या राजकीय हितासाठी नको त्या योजना जाहीर करून तिजोरीतील पैसा कमी करून कर्जबाजारी होत आहे. याबाबत पत्रकारांनी आवाज उठवण्याची गरज आहे, अशी ठीक आहे श्री देशमुख यांनी यावेळी केली.
मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये पोहोचली असून, प्रत्येक तालुक्यापर्यंत या संघटनेचे सदस्य उभा राहिले आहेत. ही आपली जमेची बाजू असून, येणाऱ्या काळात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नवी क्रांती करण्यासाठी या पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजही काही संपादकांना ही वस्तुस्थिती मान्य होत नाही. जेव्हा त्यांना यातील खरी स्थिती माहिती होईल, तेव्हा खूप उशीर झालेला असेल असेही देशमुख यावेळी म्हणाले.
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकार हा समाज आणि सत्ताधाऱ्यांना त्यांचा खरा चेहरा दाखवणारा आरसा आहे. कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला चांगले म्हटले पाहिजे. परंतु चुकीचे काम करत असेल तर ते चूक मांडण्याची भूमिका सुद्धा पत्रकारांनी घेतली पाहिजे. आज राज्यातल्या सरकारने आर्थिक उधळपट्टी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे महागाई, बेरोजगारी वाढल्याने गरिबांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. राज्य सरकारच्या विरोधात सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, खदखद आहे, ती पत्रकार बांधवांनी आपल्या प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि देशात मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जागरूक पत्रकारांची एक मोठी फळी निर्माण झालेली आहे. म्हणूनच पत्रकारांना पेन्शन आणि संरक्षण कायदा सरकारला मंजूर करावा लागला आहे. या पुढच्या काळात स्वाभिमानाने खंबीरपणे पत्रकारांना काम करता यावे, यासाठी डिजिटल मीडिया परिषद सक्रियपणे राज्यभर काम करणार आहे. संघटना वाढवून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या पत्रकारांची संघटनेला गरज आहे. त्यामुळे पत्रकारांनी ग्रामीण भागातही एकजुटीने खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार आयुब बागवान, सुभाष सुतार, गणेश क्षिरसागर, सुभाष शिंदे, सोमनाथ मोटे, संपादक सुनील पोपळे, शेख जावेद, प्रसाद कुलकर्णी, शेख खाजा, गजानन चौकटे, शेख इर्शाद, नवनाथ काळे, ओम साबळे या पत्रकारांसह एकनाथ लाड, नारायण झेंडेकर, संतोष कोटेकर, गणेश माने, सचिन पुणेकर, अनिल गंगणे आदींसह बीड जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर शिंदे, सूत्रसंचालन सुभाष शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सोमनाथ मोटे यांनी केले.