yuva MAharashtra 'यासाठी'... वसंतराव देशमुख आणि सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सांगली जिल्हा कॉंग्रेसची तक्रार !

'यासाठी'... वसंतराव देशमुख आणि सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सांगली जिल्हा कॉंग्रेसची तक्रार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२
डॉ. जयश्री थोरात व महिलांबद्दल अत्यंत हिन पातळीवर आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि वसंतराव देशमुख यांच्यावर तातडीने भारतीय दंड संहिता कलम ३५२ खाली गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार आमदार डॉ. विश्वजीत कदम व पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. यावेळी तोंडावर काळी पट्टी बांधून सुजय विखे पाटील, वसंतराव देशमुख व भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना निवेदन देण्यात आले. 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. या सभेत अध्यक्षस्थानी असलेल्या वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन महिलांचा अपमान केला आहे. सुजय विखेनेही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने महिला बद्दल वक्तव्य केले आहे.   


लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे आता अशा अनेक प्रकारांनी स्पष्ट झाले आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजप पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरातांबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा ही भाजपची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते. 

संगमनेरच्या सभेत विखेंच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. असे वक्तव्य करणारी व्यक्ती वयाने ज्येष्ठ आहे. महिलांबद्दल अशी भाषा भाजपवालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रीजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही, तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. पोलीस महासंचालकांनीही पक्षपातीपणा न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. सुजय विखे व वसंत देशमुख या विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन अटक त्यांना अटक करावी. निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख व सुजय विखेवर कारवाई करावी, अशी तक्रार आज शहर पोलीस ठाण्यात पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 
यावेळी माजी नगरसेवक रवींद्र वळवडे, अल्ताफभाई पेंढारी, रज्जाक नाईक, अजय देशमुख, बिपिन कदम, सनी धोतरे, शेरुभाई सौदागर, अजिजभाई मेस्त्री, महावीर पाटील नांद्रे, महावीर पाटील, विजय आवळे, शितल सदलगे, गौस नदाफ, रोहन खुटाळे , मयूर पेडणेकर, अभी सूर्यवंशी, आशिष चौधरी, प्रशांत देशमुख, रामभाऊ पाटील, अशोक रासकर, नितीन तावदारे, ताजुद्दीन शेख, पृथ्वीराज बोंद्रे, प्रशांत माने, श्रेणिक पाटील, प्रशांत अहिवळे, संकेत पाटील, इरफान केडिया, संजय मेथे, अनिल मोहिते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.