| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २६ ऑक्टोबर २०२४
कोल्हापुरात खासगी बसला आग लागल्यानं एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बेळगाहून पुण्याला जात असताना बसने पेट घेतला. यात एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती समजते. बेळगावहून पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली. यामध्ये एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला.
पुणे-बगळूर महामार्गावर गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडी दरम्यान शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हा 'बर्निंग बस 'चा थरार घडला. या भीषण दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य सहा प्रवासी सुदैवाने बचावले. आग लागताच बसचालक व सहायक घटनास्थळावरून पसार झाले.
गोकुळ शिरगाव येथे बस येताच अचानक इंजिनने पेट घेतला. इंजिनला आग लागल्याचे पाहताच चालक आणि सहायकाने घटनास्थळावरून पलायन केले. बसमधील प्रवासी गडबडीने खाली उतरले. मात्र, एक प्रवासी झोपेत असल्याने बसमध्येच अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
बसला आग लागल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशन दलाला पाचारण करण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती. दरम्यान, आगीची ही घटना इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.