| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १३ ऑक्टोबर २०२४
‘सत्तांतर’, ही कादंबरी म्हणजे वानरांच्या, माकडांच्या जीवनशैलीचा प्राणीशास्त्रज्ञ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून प्रसिद्ध केलेल्या शोध अहवालांच्या आधारावर व्यंकटेश माडगुळकरांनी केलेले गोष्टीरूप कथन. या कादंबरीबाबत “ही सबंध कादंबरी वानरांच्या जीवनवर्तनातून मानवी सत्तासंघर्षावर, चालू राजकीय स्थितीवर मूकपणे टीका-टिपणी करते’ अशा स्वरूपाचे अर्थ समीक्षकांकडून काढले आहेत. वानरांच्या जीवनशैलीचे वर्णन करतांना व्यंकटेश माडगुळकर लिहितात,
“टोळीतल्या वानरी बाहेरच्या नराशी जगू लागल्या, तर सतत भाराभर पोरं टोळीत जन्मत राहतील आणि संख्येवर बंधन राहणार नाही. सगळेच उपासमारीत सापडतील, वंशखंड होईल, शिवाय, अगदी नजिकची गोष्ट, म्हणजे हिला (वानरीला) पोर झालं, की नवा भागीदार आला.
मुडाचा (वानरांचा टोळी प्रमुख) डाव असा होता, की दोन्हीही डगरींवर पाय ठेवावेत. एक आपल्या टोळीत रोवलेला तर असावाच, पण ह्या दुसऱ्या टोळीतही एक पाय असू द्यावा. त्यामुळं त्याची प्रजा वाढणार होती. राज्याच्या सीमा वाढणार होत्या. अन्न वाढणार होतं. मुडा अधिक सामर्थ्यवान होणार होता.
दोन टोळ्या एकत्र झाल्यावर, एवढा मोठा परिवार, एवढी मोठी हद्द संभाळणं एका नराला अशक्य होतं. असं करणं म्हणजे पेंढारी टोळ्यांना निमंत्रण होतं, पेंढारी घुसले, म्हणजे केवढा विनाश होतो, केवढे क्रूर अत्याचार होतात, हे जणू उपजत बुद्धीनं त्यांना (मादी माकडांना) कळत होतं. ही उपजत बुद्धी त्यांना विनाशाकडं जाऊ देत नव्हती. हाणामारी झाली, तर भटक्यांचं फार काही गमावणार नव्हतं, दुखापत होणार होती, क्वचित एखाद्या-दुस-या नराचा प्राण जाणार होता, पण मुडा (वानर टोळी प्रमुख) हरला तर त्याचं सर्वस्व जाणार होतं, सत्ता जाणार होती, प्रदेश जाणार होता, अन्न जाणार होतं, बायका जाणार होत्या आणि भणंग, कंगाल होऊन अपमानित जीवन त्याला पत्करावं लागणार होतं.
काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे रागलोभ, प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितलं जातं. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्र माहितीच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.”
हे वाचलं की, माणूस हा मूळतः एक पशूच आहे हे पटतं. अन्य पशु, प्राणी, पक्षी यांच्यामध्ये व माणसांमध्ये भूक, भय, मैथुन, निद्रा या व अशा कितीतरी नैसर्गिक प्रवृत्ती समान असल्याने माणूस प्रसंगी आपली माणुसकी विसरतो व त्याच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे वागतो. मानवी जीवनामध्ये संघर्ष कां, कशामुळे व कशासाठी आहे याचे मूळ इथे समजू लागते.
या दोन्ही कादंबरीच्या पार्श्र्वभूमीवर ‘वि.वा. शिरवाडकरांच्या निवडक कथां’मधील ‘बुद्धाची मुर्ती’ ही कथा वाचल्यानंतर, माणुस मुळतः पशू असला, त्याच्यातील कांही नैसर्गिक प्रवृत्ती त्याच्यामध्ये एक जनावर वास्तव्य करत असते हे सत्य सांगत असले तरी, शेवटी माणूस हा माणूस आहे, इतर प्राणी, पशुंच्यापासून आगळा वेगळा आहे समजून येते.