yuva MAharashtra पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १८ गणेश मंडळाचा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मान !

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या १८ गणेश मंडळाचा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मान !

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या जिल्हातील १८ गणेश मंडळांचा काल मंगळवार रोजी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सांगलीतील कॉलेज कॉर्नर मंडळ मिरजेतील महात्मा गणेश उत्सव मंडळ यांचा समावेश आहे. 

गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, डीजे मुक्त व लेझर मुक्त मिरवणुका व्हाव्यात, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस दलाने प्रयत्न केले. याला गणेश मंडळांकडून चांगला प्रतिसाद ही मिळाला. त्यातून पहिल्यांदाच पोलीस दलातर्फे उपविभागीय स्तरावर उत्कृष्ट मंडळांचा गौरव करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी मंडळातून पहिल्या तीन क्रमांकाच्या मंडळांना काल पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात पारितोषिक सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम. प्रणिल गिल्डा, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, विपुल पाटील, सुनील साळुंखे, सचिन थोरबोले, विशेष शाखेचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते.


स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

सांगली विभाग - प्रथम क्रमांक, कॉलेज कॉर्नर मंडळ, सांगली. द्वितीय क्रमांक, राम रहीम मंडळ, चिंतामणी नगर, सांगली. तृतीय क्रमांक - खोके संघटना मंडळ, सांगली. 
मिरज विभाग - प्रथम क्रमांक, महात्मा गांधी गणेशोत्सव मंडळ, मिरज. द्वितीय क्रमांक, बाल गणेशोत्सव मंडळ, कुपवाड. तृतीय क्रमांक शिवराज मंडळ, रसूलवाडी.
तासगाव विभाग - प्रथम क्रमांक सिद्धेश्वर मंडळ, अंकलखोप. द्वितीय क्रमांक, सिद्धेश्वर कला-क्रीडा मंडळ, पाडळी. तृतीय क्रमांक, कुंभेश्वर मित्र मंडळ, कुंडल. 
इस्लामपूर विभाग - प्रथम क्रमांक, ए वन कला मंडळ, शिवरवाडी. द्वितीय क्रमांक, शिवशंभू मंडळ, मोहरे. तृतीय क्रमांक, जय हनुमान मंडळ, इस्लामपूर.
विटा विभाग - प्रथम क्रमांक, तिरंगा मंडळ, विटा. द्वितीय क्रमांक, क्रांती गणेश मंडळ, दिघंची. तृतीय क्रमांक, अष्टविनायक गणेश मंडळ, तडसर. 
जत विभाग - प्रथम क्रमांक, गंधर्व गणेश मंडळ, जत, द्वितीय क्रमांक, आकरा मराठा हनुमान मंडळ, अग्रण धुळगाव. तृतीया क्रमांक, संत बाळूमामा प्रतिष्ठान, कुल्लाळवाडी.


या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत असून, श्री शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी जहाल शब्दात टीका केली होती. विशेषतः मिरवणुकीत डीजेवर अंगभिक्षेप करणारी तरुण मंडळी, लेझर किरणांचा घातक वापर. यामुळे समाजातूनही अशा मंडळांवर व तरुणांवर टीका होत होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख व पोलीस विभागाने पुढाकार घेऊन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विभागवार बैठक घेऊन, प्रबोधन करण्यात आले. ज्याला अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काही मंडळांनी मात्र सकारात्मक प्रतिसादनंतरही प्रत्यक्ष मिरवणुकीत डीजे व लेझर किरणांचा वापर केल्याचे प्रकार घडले. अशा मंडळावर पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान समाजातून पोलीस अधीक्षक संदीप घुगे व पोलीस खात्याने उचललेल्या पावलाबद्दल कौतुक करण्यात येत आहे. गणेशोत्सव मिरवणुकीत होत असलेल्या बिभत्स वर्तणुकीमध्ये तात्काळ बदल होणार नसला तरी, या दिशेने झालेली सुरुवात अभिमानास्पद आहे. यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व ज्या मंडळांनी यासाठी सकारात्मक पावले उचलून बदल घडवून आणला, अशा सर्वच गणेशोत्सव मंडळाच्या संचालकांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक.