Sangli Samachar

The Janshakti News

रस्त्यावरील खड्ड्यात जेवण करून केला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध ? सांगलीतही अशा आंदोलनाची गरज !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
खड्ड्यातील रस्ते हा प्रवाशांच्या जीवितळांशी खेळण्याचा प्रकार केवळ सांगली शहर अथवा जिल्ह्यातील ग्रामीण भागातच दिसून येतो असे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 'खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ?' असे संतापजनक चित्र दिसून येत असते. या खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला आहे. परिणामी खड्डेयुक्त रस्ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी आंदोलने करण्यात येतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाला बरोबरच स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊन जर रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. यामध्ये बहुतेक वेळा चक्काजाम करून वाहतूक रोखली जाते. मात्र यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो. विशेषतः रुग्णवाहिकांना मार्ग न मिळाल्याने रुग्णांना व नातेवाकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही वेगळी अवस्था नसते. आणि म्हणूनच परभणी जिल्ह्यातील जिंतूर-येलदरी मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यात यावेत, याबाबतच करण्यात आलेले एक अनोखे आंदोलन जिल्ह्यातील नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे.


या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने दिली. छोटीमोठी आंदोलने ही केली. पण ढिम्म प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत नव्हते. म्हणून मग संतप्त नागरिकांनी अनोखे आंदोलन करीत प्रशासनासह जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ याच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याभोवती पंगत मांडीत नागरिकांनी चक्क जेवण केले व प्रशासनाचा निषेध नोंदवला. 

जिंतूर येलदरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. शिवाय परिसरातील अनेक गावांना जोडणारा हाच एकमेव मार्ग. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. तरीही याचे कोणतेही सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना नव्हते. 

त्यामुळे परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी येलदरी, शेवटी, माणकेश्वर, केदार, अंबरवाडी आदि गावातील नागरिकांनी, या मार्गावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन, मार्गावरील मोठ्या खड्ड्याभोवती पंक्तीचे आयोजन केले. . यावेळी परिसरातील नागरिकांनी निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला. 

सध्या सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक मार्ग अक्षरशः उघडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच आहे. सांगली शहरात नुकत्याच एका प्रवाशाला आपला जीव गमावा लागला. सांगली शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर अर्धा अर्धा फूट खड्डे पडले आहेत, ज्या मार्गावरून शेकडो वाहने ये'जा करीत असतात. हे खड्डे मोजवावेत, चांगले रस्ते तयार करावेत यासाठी जिल्ह्यातील अनेक मंडळांनी आंदोलने केली आहेत. परंतु परभणी प्रमाणेच सांगली सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी गेंड्याच्या कातडीचे बनले आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीचे गांभीर्य राहिलेले नाही. आणि म्हणूनच आता सांगलीसह जिल्ह्यात खड्डेजेवण घालण्याचे आवश्यकता आहे. पाहूया यामुळे तरी प्रशासनातील ढिम्म अधिकारी हलतात का ?...