yuva MAharashtra रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर, होणार भव्य सत्कार !

रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर, होणार भव्य सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
प्रतिवर्षी अखिल महाराष्ट्र नाट समिती सांगलीतर्फे रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारा मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुहास जोशी यांना देण्यात येणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत केली. विष्णुदास भावे पुरस्कार मिळवणाऱ्या श्रीमती सुहास जोशी या 56 व्या मराठी कलाकार. 

सुहास जोशी या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म 12 जुलै 1947 चा. त्यांनी गेली अनेक वर्षे असंख्य मराठी नाटके, चित्रपट, हिंदी चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी टी व्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.


कलेच्या प्रवासात त्यांना झी गौरव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेअर अशा अनेक संस्थातर्फे जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी २५ मराठी नाटके, अनेक हिंदी आणि मराठी दूरदर्शन मालिका, मराठी हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारामध्ये नाट्य दर्पण, मराठी ग्रंथ संग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

त्यांची जी गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे आनंदी गोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृती चित्रे, अग्निपंख इत्यादी. तसेच तू तिथे मी, आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई असे गाजलेले मराठी चित्रपट आणि अनेक मराठी हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेले आहे. याच बरोबर गेली काही वर्षे लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्गाचे संचालन करीत आहेत.

विष्णुदास भावे गौरव पथकाचे मानकरी

  • बालगंधर्व
  • केशवराव दाते
  • आचार्य अत्रे
  • श्री ललित कला दर्शन (भालचंद्र पेंढारकर)
  • मामा पेंडसे
  • नानासाहेब फाटक
  • मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर
  • श्रीमती दुर्गा खोटे
  • पु ल देशपांडे
  • ग दि माडगूळकर
  • पु श्री काळे
  • श्रीमती हिराबाई बडोदेकर
  • बापूराव माने
  • छोटा गंधर्व
  • दत्तोपंत भोसले
  • श्रीमती जोशना भोळे
  • माधव मनोहर
  • विश्राम बेडेकर
  • विमल कर्नाटकी
  • मराठी रंगभूमी पुणे, (शिलेदार मंडळी)
  • दाजी भाटवडेकर
  • श्रीमती विठाबाई नारायणगावकर
  • पंडित राम मराठे
  • प्रभाकर पडशीकर
  • आत्माराम भेंडे
  • वसंत कानेटकर
  • विद्याभर गोखले
  • मास्टर अविनाश
  • श्रीमती विजया मेहता
  • पुरुषोत्तम दारव्हेकर
  • शरद तळवळकर
  • चित्रांजन कोल्हटकर
  • डॉक्टर श्रीराम लागू
  • सौ सुधाकर करमरकर
  • मोहन वाघ
  • पंडित सत्यदेव दुबे
  • चंद्रकांत गोखले
  • प्राध्यापक मधुकर तोरडमल
  • डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे
  • प्रसाद सावकार
  • निळू फुले
  • दिलीप प्रभावळकर
  • रामदास कामत
  • शं ना नवरे
  • श्रीमती फैयाज शेख
  • रत्नाकर मतकरी
  • अमोल पालेकर
  • महेश एलकुंचवार
  • डॉक्टर जब्बार पटेल
  • विक्रम गोखले
  • जयंत सावरकर
  • मोहन जोशी
  • मोहन आगाशे
  • श्रीमती रोहिणी हट्टंगडी
  • प्रशांत दामले
  • श्रीमती सुहास जोशी