| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑक्टोबर २०२४
सध्या तरुणाईत कराओके गाणे यांची मोठी क्रेझ आहे. यामधून अनेक नवोदित कलाकारांना आनंद मिळत असतो. मात्र हा आनंद बऱ्याचदा चार भिंतींच्या आतच घ्यावा लागतो. याची दखल घेऊन, अनेक संस्था या कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देत असतात.
या पार्श्वभूमीवर सांगली समाचार वेबपोर्टलने नव्यानेच या क्षेत्रात उतरलेल्या स्टार नक्षत्र इव्हेंट ग्रुपच्या साथीने अशा नवोदित कलाकारांना संधी मिळावी म्हणून भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला नवोदित गायकाप्रमाणेच यामध्ये करिअर करू पाहणाऱ्या गायकांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला. सांगली जिल्ह्यातील नवोदित गायकांप्रमाणेच जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कणकवली, सातारा, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणावर नवोदित गायकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
नोंदणी केलेल्या 73 स्पर्धकांमधून तीन स्तरावर गाण्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पत्र, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे भव्य बक्षीस देण्यात आले. महत्त्वाचे गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही सहभागी गायकांना स्वतंत्ररित्या वेगवेगळी बक्षीसे देण्यात आली. यामुळे स्पर्धकातून आनंद व्यक्त करण्यात येत होता.
सांगलीतील दैवज्ञ भवन मध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुरुष विभागातून शुभम कुरुंदवाडकर याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांक दुर्गाप्पा ऐवळे आणि आसिफ मरब यांना विभागून देण्यात आला. तसेच तृतीय क्रमांक ही नितीन गायकवाड व कुणाल शर्मा यांच्यात विभागून देण्यात आला. तर मुकुंद दीक्षित, संग्राम पाटील, महेश खाडे, प्रदीप जाधव, पुष्पक गवई यांना उत्तेजनार्थ बक्षीसे प्रदान करण्यात आली.
स्त्री विभागात प्रथम क्रमांक नम्रता गुरव या गुणी तरुणीने पटकावला तर द्वितीय क्रमांक कौसर मुजावर यांनी मिळवला. तृतीय क्रमांक पल्लवी चव्हाण यांना देण्यात आला. तर माधुरी माळी, दीक्षा पाटील, अपूर्वा जावळे आणि सुप्रिया सागावकर, श्रेया ठोंबरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सात वर्षाच्या छोट्या गायिकेपासून ते 70 वर्षाच्या वयस्कर गायकापर्यंत स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दैवज्ञ भवन मध्ये मोठ्या प्रमाणावर संगीतप्रेमी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या स्पर्धा रात्री दहापर्यंत सुरू होत्या. या स्पर्धेत अर्चना कदम, अवधूत कदम आणि आकाश तिवडे यांनी परिक्षकाची अत्यंत तटस्थ भूमिका पार पाडली. स्पर्धेसाठी सुगंध सुतार, सुनील कोटे, फिरोज मुल्ला, सुहास फडतरे , विनोद साळुंखे, निता मुरगुडे, निता अडके, अनुष्का अडके, माधुरी माळी, अरमानभाई नदाफ यांच्यासह अनेकांनी अत्यंत हिरीरीने स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली. सांगलीच्या कराओके इव्हेंट क्षेत्रात या स्पर्धेचे आणि यशस्वी स्पर्धकांचे कौतुक करण्यात येत आहे.
परीक्षक त्रिमूर्तीसह संयोजक झाकीरभाई नदाफ !
यशस्वी स्पर्धक !