yuva MAharashtra भाजपच्या बैठकीत पडळकरांच्या उमेदवारीला जत येथील भूमिपुत्रांचा विरोध, दोन्ही गटातील समर्थक एकमेकांशी भिडले !

भाजपच्या बैठकीत पडळकरांच्या उमेदवारीला जत येथील भूमिपुत्रांचा विरोध, दोन्ही गटातील समर्थक एकमेकांशी भिडले !


| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ७ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित केलेल्या एका बैठकीत, भूमिपुत्र उमेदवारीच्या प्रश्नावरून विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक व जत मधील भूमिपुत्र या भाजपामधील दोन्ही गटात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस सर्वांसमोर आली. 

विधानसभा मतदारसंघात तमनगौडा रवी पाटील हे तालुक्यातील दमदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेली कामगिरी जतकरांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. त्याचप्रमाणे जत तालुक्याच्या गेल्या अनेक वर्षांचा कळीचा मुद्दा ठरलेल्या पाणी प्रश्नाबाबत भाजपाच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपामधून इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी काढलेली पदयात्रा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली होती.


दुसरीकडे विधान परिषदेचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हेही जत विधानसभेसाठी मतदारसंघातील मतदारांशी संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.अत्यंत आक्रमक म्हणून गोपीचंद पडळकर यांची सर्वांना ओळख आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी टर्निंग पॉईंट ठरली होती. 

या बैठकीस भाजपाचे तालुक्यातील पदाधिकारी व दोन्ही गटातील समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील व पडळकर यांची भूमिका स्पष्ट करीत असताना, दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन, दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याचे पाहताच जतचे भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी, भाजपा प्रभारी रमेश देशपांडे, प्रभाकर जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण तसेच स्वतः तमनगौडा रवी पाटील आदींनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना शांत केले.

तम्मनगौडा रवी पाटील व गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय प्रकाश जमदाडे हे देखील भाजपा कडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. सांगली मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी सभासदांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून यापैकी कोणालाच उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नसला तरी, तिघांचेही समर्थक आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळाली असल्याच्या अविर्भावात आहेत. मतदारसंघात या सर्वांकडून तसा प्रचारही सुरू आहे. 

तालुक्यातील भाजपाशी जवळीक असलेल्या मतदारांबरोबरच येथील गटातटाचा विचार करता माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या ते तम्मनगौडा रवी पाटील यांच्या पाठीशी असल्याने, रवी पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे. याचाच राग गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये दिसून येतो. जो या निमित्ताने भाजपच्या बैठकीत उफाळून आला.

संपूर्ण जत तालुका या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी पिंजून काढला असून, भाजपा अंतर्गत वातावरण शिगेला पोहोचले आहे. या निद्रिस्त ज्वालामुखीचा स्फोट शनिवारी झालेल्या भाजपा प्रभारी रमेश देशपांडे यांच्या समोरच झाला. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसतसा हा वाद आधीच चिघळत जाण्याची शक्यता असल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तत्पूर्वी शनिवारी झालेल्या या राड्याची चर्चा जत तालुक्यात चवीने सुरू आहे.