Sangli Samachar

The Janshakti News

स्व. टी. के. पाटील दगडी बांधकामाचा बादशाह - एन. डी. बिरनाळे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत अनेकांनी भरीव योगदान दिले आहे... देत आहेत. त्यामध्ये स्व. टी. के. पाटील यांचे योगदान लक्षवेधी आहे. सांगली हायस्कूलच्या तंत्र विभागाला स्थैर्य मिळवून देण्यात सरांचा वाटा मोठा आहे. पूर्वी सांगली हायस्कूलच्या तंत्र विभागाकडील विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलसाठी वालचंद काॅलेजला जायला लागायचे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन मानद सचिव स्व. नेमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली हायस्कूल तंत्रनिकेतन विभागाला रु. ९० हजाराचे शासकीय अनुदान मिळाले आणि तंत्र विभाग साहित्य साधनांनी सुसज्ज झाला. या कामी स्व. नेमगोंडा पाटील आणि स्व. टी. के. पाटील यांचे कष्ट कौतुकास्पद आहेत. 

लठ्ठे पाॅलिटेक्निक मंजूरीपासून ते सांगली हायस्कूल मधील ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या मदतीने स्थिरस्थावर करण्यात सरांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांच्या ऋणातून थोडी फार उतराई होण्यासाठी संस्थेने कुपवाड औद्योगिक वसाहतीत असलेल्या लठ्ठे पाॅलिटेक्निकच्या खुल्या सभागृहाला त्यांचे नाव दिले आहे.
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आर्थिक अडचणीत असताना बांधकामाला पैसा उपलब्ध होण्यासाठी स्व. नेमगोंडा पाटील आणि स्व. टी. के. पाटील यांनी संस्थेची चुनाघाणी सुरु केली. संस्थेच्या राजनेमी परिसरात जिथे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे जुने ऑफिस होते त्याच्या शेजारी उत्तर बाजूला चुनाघाणी होती. आता त्या जागेवर संस्थेची नवीन इमारत उभी राहिली आहे.
संस्थेच्या चुनाघाणी मधून तयार झालेला चुणा संस्थेच्या शाखांच्या इमारत बांधकामासाठी वापरुन, शिल्लक चुणा विकून आलेल्या पैशातून पुन्हा तो पैसा इमारत बांधकामाला वापरला जात असे. स्व. नेमगोंडा पाटील आणि स्व. टी. के. पाटील यांच्या या दूरदृष्टीमुळे राजनेमी परिसरात महाविद्यालयाच्या टोलेजंग दगडी इमारती उभ्या राहिल्या. दगडी बांधकामाचे बादशाह म्हणून या दोघांचा आजही उल्लेख होतो तो त्यांच्या या भरीव कामगिरीमुळेच..!


स्व. टी. के. पाटील यांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चुणाघाणी कामासाठी त्यांनी झोकून देऊन काम करणारे सेवकवजा कार्यकर्ते तयार केले. अत्यंत कमी मोबदल्यात अनेक सेवक राबले आणि सरांनी त्यांना वाऱ्यावर सोडले नाही तर संस्थेसाठी त्यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवून त्यांना नंतर अनुदानित शिक्षकेतर जागेवर नोकऱ्या दिल्या. आता ते सारे सेवानिवृत्तही झाले आहेत. 

चांगले काम करणाऱ्या सेवकांचे सर कौतुक करुन त्यांचा सत्कार करायचे. संस्थेचा मानद अधीक्षक म्हणून माझ्या कामावर बेहद्द खूष होऊन त्यांनी तत्कालीन चेअरमन एस. एस. पाटील वकील यांच्याकडे माझी संस्थेचा आजीव सेवक म्हणून शिफारस केली अन मी लाईफ मेंबर झालो. 

कायम मालकी हक्काने हस्तांतर होऊनही सांगली हायस्कूलच्या मिळकतीवर सरकारी मालकीने असा उल्लेख २१ वर्षे तसाच होता. ती नोंद कमी करुन लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे नाव नोंद करण्यासाठी एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रस्ताव तयार केला त्याची सर्व माहिती टी. के. सरांनी मला दिली आणि संस्थेचे नाव नोंद झाले. 

पाटील सर हे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी नसानसात भिनलेले व्यक्तीमत्व होते. संस्थेचे ते जाँईट सेक्रेटरी असताना कायम वेळ काळ न पहाता झोकून देऊन काम करायचे..निवृत्तीनंतर देखील ते संस्थेच्या कामात मार्गदर्शन करायचे. ते संस्थेच्या कामात त्यांचे जेवणाचे वेळापत्रक कायमच कोलमडलेले असायचे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर व्हायचा, परंतु त्याची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही हाती घेतले काम तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा होता. ते आदर्श शिक्षण संस्था चालक होते. नांदगिरी हायस्कूल विनाअनुदानित असताना त्यांनी मला मुख्याध्यापक म्हणून जाता काय अशी १५पैशाचे पोष्ट कार्ड पाठवून विचारणा केली होती. 

स्व. टी. के. पाटील हे मेकॅनिकल इंजिनिअर परंतु स्व.नेमगोंडा पाटील यांच्या आदेशानुसार संस्थेच्या इमारतींचे प्लॅन, बांधकाम दर्जा व देखरेख कामात लक्ष घातल्याने ते मेकॅनिकल इंजिनिअरचे सिव्हिल इंजिनिअर झाले. त्यांनी केवळ संस्थेच्या इमारती उभ्या केल्या नाहीत तर महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जैन मंदिरे व संस्थेच्या हितचिंतकांच्या घराची बांधकामेही पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक जिनमंदीरे व घरे कमी खर्चात उभी राहिली. त्यांना स्वतःच्या प्रपंचापेक्षा लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा प्रपंच अधिक महत्वाचा वाटायचा.. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

✒️ प्रा. एन.डी.बिरनाळे