Sangli Samachar

The Janshakti News

रामदास आठवले यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सोडली भाजपची साथ, राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ ऑक्टोबर २०२४
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य नेतृत्वाने भाजप विरुद्ध बंड पुकारले असून पक्षाचे कार्यकर्ते महायुतीच्या कोणत्याही उमेदवारीचा प्रचार करणार नसल्याचा इशारा दिला असून 26 ऑक्टोबर पर्यंत महायुतीने आपल्या पक्षाला जर मागणी केलेल्या बारा मतदारसंघात उमेदवारी दिली नाही तर आमची ताकद दाखवून देऊ असे महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी बाळासाहेब जानराव, सरचिटणीस ॲड. मंदार जोशी, माजी महापौर डॉ. सिद्धार्थ भेंडे यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेस संबोधित करताना म्हटले आहे.

याबाबत बोलताना बाळासाहेब जामराव म्हणाले की, भाजपने आम्हाला आता गृहीतच धरले असून, केंद्रात केवळ एक राज्यमंत्रीपद दिले की आम्ही सारे त्यांच्या दावणीला बांधले जाऊ असा समज करून घेतला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेला आमच्या पक्षाला अशीच सावत्रपणाची वागणूक दिली होती. आता विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे राज्यात 12 जागा मागितल्या होत्या. उमेदवारी द्यायचे राहू दे, पण आम्हाला महायुतीच्या जागा वाटपात साधे चर्चेलाही बोलावले नाही. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी आहे.


संपूर्ण राज्यातील आमच्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा निर्धार केला असून, ही बाब आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले याला कळवली आहे. आता तेच याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट करतील असे सांगून जानराव यांनी यासाठी 26 ऑक्टोंबर ची डेट लाईन दिली आहे.

रामदास आठवले हे यापूर्वी काँग्रेसच्या सोबत होते. राज्यात आणि केंद्रात त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. परंतु 2014 च्या मोदी लाटेत आठवले यांनी काँग्रेसचा हात सोडत, हाती कमळ घेतले. तेव्हापासून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागत असते. मात्र आता केवळ राज्यमंत्रीपदावर समाधान न मानता पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान 12 जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांच्या पक्षाने लावले आहे.

सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून भाजप सोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि रामदास आठवले यांच्याप्रमाणेच इतर मित्र पक्षांचा त्यामध्ये सहभाग आहे. मात्र आता जागा वाटपावरून आलेल्या तिढ्यात एका पाठोपाठ एक मित्र पक्ष नाराजीची गाठ वाढवत आहेत. त्यामुळे महायुती, विशेषतः भाजप काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तर, रामदास आठवले काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.