| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑक्टोबर २०२४
ना. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री,भारत सरकार यांचे शुभ हस्ते व खा. शरदचंद्रजी पवार, माजी कृषी व संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व नुतनीकरण केलेल्या सभागृहाचे उदघाटन असा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सव स्मरणिका प्रकाशन समारंभ व महाराजांच्या सरदारांचे वंशज आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता मराठा समाज कार्यालय, आंबेडकर रोड सांगली, येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास राज्यातील सर्व जाती धर्मातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहत आहेत, तसेच जिल्ह्यातीलही आजी-माजीआमदार, सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी माजी अध्यक्ष - सदस्य, समाज घटकातील, तरुण मंडळातील कार्यकर्ते, क्रीडा संस्थाचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या कार्यक्रमास निमंत्रित केले आहेत. मराठा समाज संस्थेने अनेक वर्ष विविध माध्यमातून आपले काम सर्व समाजांच्या पुढे चांगल्या पद्धतीने ठेवले आहे.मराठा समाज संस्था ही फक्त मराठा समाजापुरती मर्यादित काम न करता, सर्व समाजासाठी काम करीत आहे. त्यामुळे सर्व समाज घटकांतील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री संजयकाका पाटील यांनी केले आहे.