Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेने वाचवले हजारो रुग्णांचे कोट्यावधी रुपये, नागरिकांतून समाधान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑक्टोबर २०२४
तिसरा वर्धापन दिन साजरा करीत असलेल्या सांगली महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रामुळे ५१ हजार ३४३ रुग्णांचे तब्बल ३ कोटी ८१ लाख ९७ हजार रुपये वाचले आहेत. 
सांगली महापालिकेच्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्राचा तृतीय वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निदान केंद्राचे कामकाज सुरू आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामधील सामान्य गरजू, गोरगरीब नागरिकांना विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, ईसीजी तसेच एक्स-रे या सेवांचा मोफत व अल्प दरांमध्ये लाभ घेता यावा, या हेतूने हे केंद्र सुरू झाले. पडीक असलेल्या एका इमारतीचा पुनर्वापर करून या केंद्राद्वारे निव्वळ नागरिकांना उत्तम प्रकारे सेवा देण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवण्यात आले.


केंद्र व महालॅबतर्फे ८५ मोफत चाचण्या

सध्या मध्यवर्ती निदान केंद्र व महालॅब, असे संयुक्तरीत्या कार्यरत आहेत. मध्यवर्ती निदान केंद्राकडून १५ स्पॉट, ईसीजी व एक्स-रे मिळून एकूण ४८ प्रकारच्या व महालॅबकडून ३७ प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जातात. त्यामुळे दिवसेंदिवस निदान केंद्रामध्ये रुग्णांच्या होणाऱ्या तपासण्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

महापालिकेला ४१ लाखांचे उत्पन्न

केंद्र सुरू झाल्यापासून ९ ऑक्टोबर २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३ कोटी ८१ लाख ९७ हजार ८६५ रुपयांची नागरिकांची बचत झाली आहे. महापालिकेस ४१ लाख ८१ हजार १७४ रुपयांचे उत्पन्नही मिळाले. केंद्राकडून आजअखेर ५१ हजार ३४३ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. एकूण १ लाख ४८ हजार ४१८ तपासण्या पार पडल्या.

नागरिकांनी लाभ घ्यावा : शुभम गुप्ता

सध्या मध्यवर्ती निदान केंद्रामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, चांगल्या दर्जाची सेवा देण्यात येत आहे. या केंद्राकरिता तीन लॅब टेस्टिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.