yuva MAharashtra अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराची चाळीस एकर, तर विजयनगर येथील शेतकऱ्यांच्या बाराशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा !

अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराची चाळीस एकर, तर विजयनगर येथील शेतकऱ्यांच्या बाराशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा !


| सांगली समाचार वृत्त |
अहिल्यानगर - दि. २९ ऑक्टोबर २०२
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवरुन वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थानात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की जमीन एका दर्ग्याच्या मालकीची असून २००५ मध्ये वक्फ कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती. ब्रिटीश काळापूर्वीच्या या जामिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे असल्याचे कानिफनाथ मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे.

मंदिराचे विश्वस्त श्री हरी आंबेकर यांनी सांगितले की, ही जमीन पूर्वी शंकर भाई यांच्या पत्नी बिबन यांना सेवेसाठी दिली होती. यानंतर २००५ साली काही स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी वक्फ कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करुन ही जमीन वक्फच्या नावावर नोंदवली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. कानिफनाथ मंदिर पाडून त्याचे दर्ग्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न सुरू असता हा वाद आणखी चिघळला आहे.


अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराची 40 एकर जागेवर हक्क सांगितल्यानंतर कर्नाटकातील विजयनगर येथील शेतकऱ्यांच्या बाराशे एकर जमीन वेळही वक्फ बोर्डाने हक्क सांगितल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील विजयपुरा येथील शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डानेही शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. वास्तविक, विजयपुरा जिल्ह्यातील होनवाडा गावात १२०० एकर जमिनीवर शाह अमिनोद्दीन दर्ग्याने आपला हक्क व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये ही जमीन शाह अमिनोद्दीन दर्ग्याच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हा दर्गा शतकानुशतके अस्तित्वात नाही, तर पिढ्यानपिढ्या या जमिनींचे मालक त्यांचे कुटुंबीय आहेत. ही जमीन वक्फमध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे ४१ शेतकऱ्यांना नोटिसा मिळाल्या असून त्यांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्यास सांगण्यात आले आहे.

ही नोटीस १९७४ च्या राजपत्रातील घोषणेवर आधारित असल्याचा वक्फ बोर्डाचा दावा आहे. वक्फ बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ही जमीन राज्य सरकारने वक्फ मालमत्ता म्हणून ओळखली होती आणि ती राजपत्रित करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना चुकून नोटिसा पाठवण्यात आल्या. वक्फ बोर्डाच्या म्हणण्यानुसार, जर शेतकऱ्यांकडे जमिनीच्या वैध नोंदी असतील तर वक्फ बोर्ड त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

या प्रकरणावरून भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एका विशिष्ट धर्माला खूश करण्यासाठी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांनी केला. दरम्यान, प्रकरण वाढताच कर्नाटकचे विजयपुरा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एम.बी. पाटील यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत वक्फ मालमत्तेच्या वादावर स्पष्टीकरण दिले. यातील केवळ ११ एकर जमीन ही वक्फ मालमत्ता आहे, तर उर्वरित जमीन शेतकऱ्यांची असल्याचे त्यांनी सांगितले.