yuva MAharashtra आता तर कमालच झाली, स्टेट बँकेची डुप्लिकेट शाखाच सुरू केली, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या; पण कुठे घडली ही घटना !

आता तर कमालच झाली, स्टेट बँकेची डुप्लिकेट शाखाच सुरू केली, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या; पण कुठे घडली ही घटना !


| सांगली समाचार वृत्त |
रायपूर - दि. ५ ऑक्टोबर २०२४
ऑनलाइन फ्रॉडचे प्रकार घडल्याचे आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, पाहतो... पण चक्क स्टेट बँकेची डुप्लिकेट शाखाच सुरू करून गावकऱ्यांना फसवण्याचा प्रकार घडला असल्याचे तुम्हा सांगितले तर विश्वास बसेल ? पण होय... असा प्रकार घडला आहे. आतापर्यंतच्या ऑनलाइन फ्रॉडधारकांची ही बाप माणसं म्हणावी लागतील. ही घटना घडली आहे ती छत्तीसगड राज्यातील सक्ती जिल्ह्यामध्ये छपोरा नावाच्या एका गावात.

गाव तसं शांत. या गावात स्टेट बँकेची शाखा दिमाखात सुरू करण्यात आली. बँकेतील फर्निचर, आवश्यक कागदपत्रे आणि काउंटर सारं काही इथं होतं. अगदी शाखाअधिकारी आणि कर्मचारीही... यांच्या नियुक्तीसाठी बनावट ऑफर लेटर देऊन मोठा आर्थिक घोटाळा केला. प्रत्येकाकडून दोन ते सहा लाखापर्यंत ची रक्कम उकळण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना तथाकथित (बोगस) अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणही दिलं. आणि सुरू झाली गावकऱ्यांना फसवणारी ही बनावटगिरी....

गावात राष्ट्रीयकृत स्टेट बँकेची शाखा सुरू झाल्याने, गावकऱ्यांना आनंद झाला या ठिकाणी खाती उघडण्यासाठी गावकरी पोहोचले. व्यवहारही सुरू झाले. पण छापरा गावात स्टेट बँकेची शाखा ची माहिती शेजारील डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला समजली. त्याला शंका आली. कारण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती इतर शाखांना दिली गेली नव्हती. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि या बोगस बँकेत चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व एसबीआय अधिकारी पोहोचले व साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला. तपासांती बँक बनावट असल्याचं सिद्ध झालं. 


पण या बनावट स्टेट बँकेच्या शाखेचे कामगिरी कशी उघड झाली ? तर... अजय कुमार अग्रवाल या स्थानिक गावकऱ्याने छापरा येथील संबंधित स्टेट बँकेमध्ये कीऑस्कसाठी अर्ज केला होता. गावात अल्पावधीत बँकेची शाखा कशी निर्माण होऊ शकते ? असा संशय त्याला आला. कारण त्यांच्या गावाची अधिकृत बँक शेजारील डाबरा या गावात होती. बँक सुरू होण्यापूर्वी जाहिरात दिली जाते. परंतु अशा जाहिरातीची कोणतीही माहिती अग्रवाल यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्याने बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली परंतु बँक कर्मचाऱ्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. शिवाय सर्वात मोठी चूक होती, ती शाखेच्या साईनबोर्डवर शाखा क्रमांक देण्यात आला नव्हता. तेव्हा त्याने डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली.

पोलिसांना या बनावट शाखा प्रकरणी रेखा साहू, मंदिर दास आणि पंकज यांच्यासह अन्य चार लोकांची ओळख पटली आहे. गावातील तोषचंद्र यांच्या कॉम्प्लेक्समध्ये महिला सात हजार रुपये भाड्याने स्टेट बँकेची ही बनावट शाखा सुरू करण्यात आली. बँक कायदेशीर वाटण्यासाठी योग्य ते फर्निचर आणि चिन्हांची ही व्यवस्था केली होती.अगदी साईन बोर्ड ही हुबेहूब केला होता. परंतु गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कुठलातरी पुरावा मागे सोडतोच. या गुन्हेगारानी बोर्डाच्या माध्यमातून हा पुरावा मागे सोडला. 

नोकरीच्या निमित्ताने बेरोजगारांना आर्थिक नुकसान तर सोसावे लागलेच कायदेशीर अडचणींचा सामना आहे करावा लागत आहे. संबंधित ठकसेनांच्या मागावर पोलीस यंत्रणा असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश पटेल म्हणाले.