| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत महाआघाडीची सत्ता आणायचीच या जिद्दीने महाआघाडीचे वरिष्ठ नेते तयारीला लागले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांनी 288 मतदारसंघात 'निवडून येण्याची क्षमता' या एकाच मुद्द्यावर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काही ठिकाणी तिन्ही पक्षाची ताकद मोठी आहे. अशा काही मतदारसंघांना वगळून इतर मतदारसंघात बलाढ्य उमेदवारांची चाचणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर चर्चा आहे ती सांगली विधानसभा मतदारसंघाची. येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील व काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील या दोघांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे येथे सामंजस्याने मार्ग काढून एकाला विधान परिषदेत तर दुसऱ्याला विधानसभेवर पाठवायचे असा निर्णय गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाला आहे. प्रश्न हा आहे विधान परिषदेचा हा उतारा दोघांपैकी कोण एक जण स्वीकारणार ?
सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांना गत विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारला लागला. परंतु पराभवाने खचता ते पुन्हा ताकदीने उभे राहिले. विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा मागोवा घेऊन त्यांनी आंदोलने करण्यास सुरुवात केली. तर त्याचवेळी शिक्षक संघटनेचे आंदोलन असो, महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन असो किंवा मग रिक्षा संघटनेचे. अशा प्रत्येक आंदोलनात आघाडीवर राहून काँग्रेस तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. ज्याप्रमाणे पृथ्वीराज बाबांनी त्यांना शब्द दिला, तसेच या सर्व संघटनेच्या नेत्यांनीही काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला आहे.
त्याचवेळी पृथ्वीराज बाबांनी विविध सणासुदीच्या माध्यमातून सर्व समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान 2019 आणि नुकताच येऊन गेलेल्या महापुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना त्यांनी मोठा आधार दिला. विशेषतः त्यांनी खेळलेले हिंदू कार्ड त्यांना चांगलेच फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. या पाच वर्षात त्यांनी केलेली आंदोलने, सांस्कृतिक कार्यक्रम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
दुसरीकडे श्रीमती जयश्रीताई पाटील यांनीही काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात दिसून येत होत्या. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या माध्यमातून त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या कारवाईची तमा न बाळगता विशाल पाटील यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली. त्याचवेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो नातेसंबंधांचा. माजी मंत्री आणि जिल्ह्यातील काँग्रेसची कमान आणि कमांड ज्यांच्या हाती आहे, ते आ. डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांच्याशी असलेले नाते. हे दोन्ही नेते विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या मागे उभे राहतात की, गेली पाच वर्ष किंबहुना दहा वर्षे ज्यांनी जनतेसाठी आपला वेळ, पैसा आणि ताकत खर्च केले त्या बाबा पाटील यांच्या पारड्यात आपले वजन टाकतात ?
नुकतीच आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील या दोन्ही नेत्यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या समर्थकांची चर्चा केली. त्यावेळी एका बंद खोलीत आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील आणि जितेश कदम यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांची समजूत काढल्याची चर्चा आहे. परंतु त्याचवेळी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत यावेळी जयश्रीताईंनाच उमेदवारी मिळायला हवी, आम्ही त्यांना निवडून आणू असा हट्टाग्रह धरला.
आता हे तिघे नेते पृथ्वीराजबाबा पाटील व त्यांच्या समर्थकांचे चर्चा करणार असून, त्यांनाही परिस्थितीचे जाणीव करून देणार आहेत. त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीसाठी विधान परिषदेचा उतारा कोण स्वीकारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात व जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या समर्थकात सुरू आहे. तर जनतेलाही येथील उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.