| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
अनेक वेळा अनेक ठिकाणी पारंपारिक शिक्षणाला दोष देत असतात. शाळेत शिकवले जाणारे विषय खरच महत्त्वाचे असतात का ? इतिहासातील सनावळी वाचून काय होणार ? असाही प्रश्न विचारला जातो. परंतु दैनंदिन जीवनात जगत असताना शालेय पुस्तकातील धडे जगण्यासाठीचे धडे शिकवून जातात. फक्त त्यातून आपण काय धडे घेतो हे महत्त्वाचे असते.
खरं तर पहिलीपासूनच आपण पाढे घोकंपट्टीने पाठ केलेले आहेत. परंतु कुणी आपल्याला विचारलं सध्या काय चालू आहे ? आपण उत्तर देतो, काही नाही... 'बे एके बे' सुरू आहे. म्हणजे या पाढ्याचा उपयोग आपल्याला अशाही पद्धतीने होऊ शकतो .आता सातच्या पाढ्याचेच उदाहरण घ्या. आपण साऱ्यांनीच सातचा पाढा पाठ केला आहे. त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं ? जीवनातील गम्य या सातच्या पाढ्यात लपलं आहे हे तुमच्या लक्षात तरी आलं का हो ? मग... सध्या सोशल मीडियावर हे एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे... तुम्ही ऐकलात ?... नसाल ऐकलं तर त्याचाच आधार घेऊन, मी आपणासमोर जीवनाचे महत्त्व मांडतो. पहा हं...
७×१ = ७ बालपण
७×२ = १४ वयात येण्यास सुरुवात
७ ×३ = २१ लग्नाचे वय
७×४ = २८ मुलं बाळ
७ ×५ = ३५ सुखी संसार
७ ×६ = ४२ मुलांचे शिक्षण
७×७ = ४९ मुलांचे लग्न
७×८= ५६ नातवंडाचे सुख
७×९ = ६३ म्हातारपणाला सुरुवात
७ ×१० = ७० देवाचे नामस्मरण...
जगात हुशार माणसांची कमी नाही. त्यांच्या डोक्यात वरील प्रमाणे नावीन्यपूर्ण कल्पना येत असतात. जगण्याचं मर्म अशा व्यक्तीकडून खरंच शिकायला हवं. आता इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर झालेल्या या व्हिडिओवर वाचकांनी उलट सुलट प्रतिक्रिया दिल्यात हा भाग वेगळा. टीका करणाऱ्याला काय हो ? त्यांना कधी कुठे चांगल्यातून चांगलं शोधत येत ? असो हा नवीन पाढा आपल्या आयुष्यात जीवन जगताना बरच काही शिकवून जातो. होय ना ?