Sangli Samachar

The Janshakti News

उच्चभ्रूंच्या भाषेचा सन्मान केला जात असताना, मराठी भाषा चलनात ठेवण्याची जबाबदारी मराठी माणसांची - डॉ. तारा भवाळकर


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे ठीक, त्याचं समाधानही आहे. पण समाजात पहिल्यापासून उच्चभ्रूंच्या भाषेचा सन्मान केला जातो आणि सामान्यांची भाषा डावलली जाते. म्हणूनच मराठी भाषा चलनात ठेवायची जबाबदारी मराठी माणसांची असल्याचे भाष्य, 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. तारा भवाळकर यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना केले.

यावेळी बोलताना डॉ. बाबाळकर म्हणाल्या की, पूर्वी संस्कृतला मोठेपणा होता, आता तो इंग्रजीला आहे. पूर्वी सामान्यांची जी प्राकृत भाषा होती ती डावलेले गेली. तशी आता मराठीची अवस्था दिसून येत आहे. मराठी शाळा आणि ग्रंथालयांची अवस्था तर वाईट आहेच. इंग्रजीला सर्वश्रेष्ठ समजत असताना, आपल्या भाषेला दुय्यम का मानायचं असा सवाल करून डॉ. भवाळकर यांनी आपल्याला आपल्या भाषेची अस्मिता असायलाच हवी असा आग्रह यावेळी धरला. 


लोक संस्कृती टिकवायची असे नुसते बोलून ती टिकत नाही आणि टिकवताही येत नाही. कारण तो लोकसमूहाचा अविष्कार असतो. लोकसंस्कृती हा प्रवाह आहे तो अखंड चालत राहायलाच हवा. संस्कृतीच्या प्रवाहात काही नवीन गोष्टी तयार होतात. काही राजकीय लोक काही गोष्टी बदलायचा प्रयत्न करतात. जुन्या गोष्टी अनेक कारणांनी गळून पडतात. पण प्रवाह नेहमी ताज्या असतो तो शिळा होत नाही या प्रवाहातील चांगल्या गोष्टी घेणं महत्त्वाचं असतं, असंही डॉ. भवाळकर म्हणाल्या.

यावेळी बोलताना डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या की, शिक्षण असणं आणि शहाणपण असणं यातही खूप अंतर आहे. अडाणी आणि निरक्षर फरक असल्याचे सांगून त्या म्हणाले की लोकसाहित्य आणि लोक संस्कृतीतून मला सर्वसामान्य माणसाचे जीवन सापडलं. आदिम ते आज पर्यंतच्या अंतराचा माणसाचा प्रवास लोककलातून दिसून येतो. त्याचा शोध घेण्यातला आनंद हाच माझा सगळ्यात मोठा पुरस्कार असल्याचे डॉ. भवाळकर यावेळी बोलताना म्हणाल्या. लोक साहित्याला उच्चभ्रू लोक अडाणी लोकांनी निर्माण केलेले साहित्य मानतात. हा शिक्का मी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. त्यासाठी राजवाडे यांच्यापासून ढेरे यांच्यापर्यंत साऱ्यांचे मार्गदर्शन मिळालं, अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ. तारा भावाळकर यांनी सांगलीकरांचेही आभार मानले. मी सांगलीत पंचावन्न वर्षे वास्तव्यास आहे.. माझ्यावर सांगलीचे फार मोठे उपकार आहेत महाराष्ट्र कर्नाटक गोवा सीमेवर असलेले हे शहर आहे. या सांगली मुळेच मला या साऱ्या सीमापलीकडचं बघता आलं. तामिळनाडू नाटकांचा अभ्यास करता आला कर्नाटकी गोवा दशावतार यांनाही जाणून घेता आलं, असंही त्या शेवटी म्हणाल्या.