Sangli Samachar

The Janshakti News

एक अखंड धागा.... (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ११ ऑक्टोबर २०२४
मागील आठवड्यामध्ये तीन कादंब-या वाचण्यात आल्या, पहिली ‘हरदत्तचा जिंदगीनामा’, मूळ हिंदी भाषेतील कादंबरी ‘हरदत्त की जिंदगी’ लेखक अमृताप्रीतम, मराठी भाषेत भाषांतर पद्माकर जोशी, दुसरी कादंबरी ‘सत्तांतर’ लेखक व्यंकटेश माडगूळकर, व तिसरी ‘तत्वमसि’ मूळ गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांच्या कादंबरीचे त्याच नांवाने अंजनी नरवणे यांनी केलेले मराठी भाषांतर आणि एक कथासंग्रह... आज पद्माकर जोशी यांच्या ‘हरदत्त की जिंदगी’ या कथेचा परावर घेऊ... 

लेखकाने पुस्तकात उल्लेखलेला काळ हिंदुस्थानावरील इंग्रजी शासन हटवण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीच्या काळापासून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढील आठ-नऊ वर्षांचा. कादंबरीचा नायक मदन हरदत्त शालेय जीवनापासूनच क्रांतीकारक बनण्याचे, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे, प्रसंगी तुरूंगात जाण्याचे स्वप्न पाहात असतो. शाळेमध्ये तो किंग जॉर्जची तसबीर जाळतो, तुरूंगात जाण्यासाठी लाल रंगाचा कोट घालतो, शाळेमध्ये हरताळ पाळतो, इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देतो. 

पुढे साम्यवादी विचारांची पुस्तके, परिपत्रके, बातम्या वाचून, ऐकून, सर्व लोक समान असलेल्या, गरीब-श्रीमंत असे वर्ग नसलेल्या, रशियाला जाऊन तेथील परिस्थिती डोळ्यांनी पाहायची, कानांनी ऐकायची, व कम्युनिझमचा अभ्यास करून आपल्या देशामध्येही तसेच वातावरण तयार करण्याचा तो ध्यास घेतो आणि, एके दिवशी रशियाला जाण्यासाठी घरातून पळून जातो. इथूनच या कथेला, क्रांतीच्या विचारांनी भारावलेल्या मदन हरदत्तच्या जीवनाला कलाटणी मिळते.

मुस्लीम मौलवीचे रूप धारण करून मदन हरदत्त दिल्लीहून श्रीनगरमार्गे हिंदुस्थानाच्या सरहद्दीजवळ असलेल्या स्वतंत्र टोळीवाल्यांच्या प्रदेशातून अरबस्तान, अफगाणिस्तानातून अनेक अडचणींना तोंड देत, चांगले वाईट अनुभव घेत, कसाबसा रशियाच्या हद्दीत पोहचतो. त्याला वाटते गरीब-श्रीमंत भेद नसलेला, सर्व लोकांना समानतेने वागवणारा देश प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहायचे, त्याला समजाऊन घेण्याचे आपले स्वप्न आता पुरे होणार, या विचारांने तो आनंदी होतो. पण त्याचे जीवन परत एक वेळ वेगळे वळण घेते. रशियामध्ये त्याचे स्वागत होते, सरहद्दीवरील हुकुमाचे ताबेदार असलेल्या रशियन गार्डसकडून आणि मदन हरदत्तची रवानगी होते दगडी भिंतींच्या तुरूंगामध्ये. 


यापुढचे कथानक म्हणजे, दडपशाही, दंडुकेशाही, नांवालाच असणारा कायदा, तुरूंगातील कैद्यांचा विविध रितीने केला जाणारा मानसिक व शारीरिक छळ, तुरूंगात मिळणारे निकृष्ठ व अपुरे जेवण, व अशाही दुष्कर परिस्थितीमध्ये कधीकाळी आपली तुरूंगातून सुटका होईल, माणसाप्रमाणे आपल्यालाही जगता येईल, या दुर्दम्य आशेवर आला दिवस ढकलून जगणा-या मदन हरदत्तच्या मनातील विचारांच्या आंदोलनाचे वर्णन. 

हरदत्तचा हा जिंदगीनामा व त्यातील परिस्थिती वाचतांना जाणवते की, काळ कोणताही असो, कालचा भूतकाळ वा आजचा वर्तमानकाळ, राज्यकर्त्यांनी देशादेशामध्ये तयार केलेल्या अदृश्य भिंती, माणसांमाणसांमध्ये केलेला भेदभाव, उच्च-नीचता यांच्या परिणामी आज माणूस माणसांवर अत्याचार करत आहे, स्वार्थाने लडबडुन एकमेकांचे शोषण करत आहे, माणसातील माणुसकीचा लोप झाला आहे. पण तरीही सर्वसामान्य माणूस, 

‘ बीतेंगे कभी तो दिन आख़िर, यह भूख के और बेकारी के
टूटेंगे कभी तो बुत आख़िर, दौलत की इजारादारी के
जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी
वह सुबह कभी तो आएगी...*
अशा वेड्या (?) आशेवर आला दिवस ढकलत जगत राहतो. 

ही झाली पहिली कथा आता उद्या दुसऱ्या कथेचा परामर्ष घेऊया...