| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ ऑक्टोबर २०२४
सांगली येथील मराठा समाज भवनमधील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधीष्ट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कडेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेला जिल्ह्याचे दिवंगत नेते स्व. डॉ. पतंगराव कदम नामकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नेते मा. शरदचंद्रजी पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्याने जिल्ह्यातील महाआघाडीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले खरे, परंतु या दरम्यान कार्यकर्त्यांत चर्चा रंगली ती "सांगली विधानसभा निवडणुकीत साहेब कोणाला पाठिंबा देणार ?" याची...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून महाआघाडी असो किंवा महायुती सर्वच इच्छुकांनी आपआपल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीत आलेल्या मा. शरद पवार यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन श्रीमती जयश्रीताई पाटील व सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी स्वतंत्र भेट घेतली.
या भेटीत मा. शरद पवार यांनी "मागील वेळी तुमचा अतिशय निसटता पराभव झाला आहे. यावेळी साऱ्यांनी एकवटून एकजुटीने भाजपच्या उमेदवाराचा पाडाव करायचाच आहे, असे सांगून सांगली विधानसभेची जागा महाविकास आघाडी जिंकणारच आहे" असे आदेश दिले. परंतु त्यांचा नेमका पाठिंबा जयश्रीताईंना की पृथ्वीराजबाबांना हे गुलदस्त्यातच राहिले. दरम्यान दोन्ही गट 'साहेबांचा पाठिंबा आपल्यालाच' असे सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शरद पवार आणि दादा घराणे यांची 'सख्ख्य' साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. परंतु सध्या सर्वांच्या समोर भाजपाचा पाडाव करून सत्ता हस्तगत करणे हे एकमेव ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर मा. पवार साहेबांनी सावध भूमिका घेत. दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पवार यांची भेट घेतली. पवार यांनी पाटील यांच्याकडून सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मा. शरद पवार यांना सांगली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीची तसेच पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर सांगली जिल्ह्यातही राष्ट्रवादी दोन गटात दुभंगली आहे. मात्र माजी मंत्री व ' करेक्ट कार्यक्रमात' पारंगत असलेले आ. जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मागील निवडणुकीत श्री. पृथ्वीराज बाबा पाटील यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. यात कोणा कोणाचा 'हात' होता, आणि कुणी कशी 'चावी' दिली होती, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता मा. शरद पवार आणि आ. जयंत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.