Sangli Samachar

The Janshakti News

"मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींना हलक्यात घेऊ नका !"... महाविकास आघाडीला कोणी दिला सल्ला ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ ऑक्टोबर २०२४
सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना जोमात नि विरोधक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे. परंतु त्याचवेळी वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकीकडे लाडक्या बहिणीमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असले तरी, भाऊजींच्या खिशाला चाट बसत असल्यामुळे, नाराजी व्यक्त होत आहे.

गत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात तब्बल 31 जागा मिळाल्यामुळे त्यातील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. वाढत्या महागाईचा, बेरोजगारीचा, ठप्प झालेल्या विकास कामांचा फटका महायुतीला बसणार असल्याचे, महाआघाडीतील नेत्यांचा प्रचार सुरू आहे.


मात्र मध्यंतरी महाआघाडीतील वरिष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांनी लाडक्या बहिणी योजनेवरून आपल्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे कान उपटले होते. लोकसभेतील निवडणुकीतील विजयाच्या भ्रमात राहू नका, लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस व ठाकरे शिवसेनेतील नेते, कार्यकर्त्यांनाही दिला होता.

आता श्याम माधव यांनीही लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीला सल्ला दिला असून, ही योजना महाविकास आघाडीने हलक्यात घेऊ नये असे म्हटले आहे. महिला वर्गाच्या बँक खात्यात आतापर्यंत साडेसात हजार रुपये पोहोचले असून, ऐन दिवाळीत आणखी साडेपाच हजार रुपये जमा होणार असल्याने मध्यमवर्गीयांना महागाईची झळ पोहोचली नाही. त्यामुळे या लाडक्या वहिनी महायुतीची परतफेड करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. सध्याच्या काळात पंधराशे रुपये ही सुद्धा मध्यमवर्गीयांसाठी खूप मोठी रक्कम आहे. 

केवळ लाडके बहीणच नव्हे तर, इतर अनेक योजना महायुती महिलांसाठी राबवत आहे. यामुळे महिलांच्या क्रयशक्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांची क्रयशक्ती वाढली की, त्या कुटुंबाला हातभार लावणार हे नक्की. आता दिवाळीच्या तोंडावर साडेपाच हजार रुपये जमा होणार असल्याने महिलांची दिवाळी आनंदात जाणार आहे. या रकमेतून स्थानिक बाजारपेठेलाही अर्थव्यवस्थेचे बळ मिळणार आहे त्यामुळे महायुतीसाठी ही उपयुक्त गुंतवणूक आहे. 

त्यामुळे महाआघाडीतील नेते व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या या लोकप्रिय योजनेवरून टीका टिपणी न करता, त्यांचे कौतुकच करा. परंतु हे करीत असताना, भविष्यातील धोकेही त्यांच्या लक्षात आणून द्या. यासाठी तुम्हाला महायुती विरोधात घर टू घर प्रचार करावा लागणार आहे असेही श्याम माधव यांनी म्हटले आहे.