yuva MAharashtra आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला: अजित पवारांचा तासगावात आरोप !

आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला: अजित पवारांचा तासगावात आरोप !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ३० ऑक्टोबर २०२
दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री आर.आर. आबांना मी नेहमी आधार दिला. त्यांनी जे मागितले ते दिले. मात्र माझ्यावरील ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपामध्ये खुली चौकशी करण्याचे आदेश खुद्द आबांनीच दिले होते, हे पाहून वाईट वाटले, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

तासगाव येथे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी खासदार संजय पाटील यांनी मंगळवारी (दि.२९) अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित सभेत पवार बोलत होते.

यावेळी आमदार इद्रीस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दीपक देशपांडे, शेखर इनामदार, अ‍ॅड. स्वप्नील पाटील, प्रभाकर पाटील, ज्योती संजय पाटील, शिवाणी प्रभाकर पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राजवर्धन घोरपडे यासह प्रमुख उपस्थित होते.


पवार म्हणाले की, आबा आणि मी आम्ही एकत्र विधानसभेत गेलो होतो. एकमेकांना समजून घेऊन विश्वासात घेऊन काम करायचो. त्यांना गृहखाते हवे होते. मी त्यांना दिले. सर्वात जास्त गृहखाते उपभोगलेला माणूस आबा आहे. मात्र, त्यांना पदाचा वापर करण्यास जमले नाही. त्यांच्याकडे भाषणकौशल्य होते. मात्र, बोलून विकास होत नाही. तासगावमध्ये सध्या लोकांना भावनिक करुन राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याला बळी न पडता विकासासाठी संजय पाटील यांना मत द्या.

पवार म्हणाले की, २०१४ मध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी निकाल लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. मग आता मी भाजपसोबत विकासासाठी गेलो. तर काय अडचण आहे. सत्तेत राहून लोकांच्या कामांना न्याय देता यावा, यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. कोणतीही योजना बंद होणार नाही, विरोधक जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांना बळी पडू नका.

माजी खासदार व उमेदवार संजय पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील यांना अजित पवारांनी कायम ताकद दिली. पद दिली. मात्र, त्यांनी विकासापेक्षा स्वतःची प्रसिध्दी करण्यात आयुष्य घालवले. आमच्या कमरेच्या खाली वार करु नका, अन्यथा आम्ही तोंड उघडलं. तर अडचणीत याल. एकत्र असताना देखील जेंव्हा माझ्यावर अडचणी आल्या. त्यावेळी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न याच अंजनीच्या घराणे केला होता. एकदा आमदार होण्याची संधी द्या, इतिहासात नोंद होईल, एवढा निधी मतदारसंघात आणू. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.